

बालशिक्षण आणि बालसाहित्य अशा दोन्ही क्षेत्रांत प्रयोगशील अन् महत्त्वपूर्ण असे लेखन करणारे बालसाहित्यातील एक आघाडीचे नाव म्हणजे डॉ. सुरेश सावंत होय. हिरवे हिरवे झाड, जांभुळबेट, भुताचा भाऊ, बालकनीती, काठीचा घोडा, पळसपापडी, कॉमिक्सच्या जगात, रानफुले, युद्ध नको बुद्ध हवा, नदी रुसली नदी हसली, गुगलबाबा, एलियन आला स्वप्नात, आभाळमाया आणि रंग लागले नाचायला, असे एकाहून एक सरस असे त्यांचे १५ बालकवितासंग्रह आणि कष्टाची फळे गोड हा बालकथासंग्रह या सर्वच पुस्तकांनी बालसाहित्याचे दालन समृद्ध केले आहे.
शिवाय ‘वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती’, ‘बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध’, ‘आजची मराठी बालकविता’ आणि ‘बालसाहित्यातील नवे काही’ या संशोधनपर समीक्षा ग्रंथांचे लेखन करून त्यांनी दुर्लक्षित अशा बालसाहित्यातील समीक्षा क्षेत्राला चालना दिली आहे, हे विशेष.