
सुदर्शन चव्हाण
chavan.sudarshan@gmail.com
याच वर्षी आपल्याकडे मिसेस नावाची एक हिंदी फिल्म प्रदर्शित झाली. ती ज्या मल्याळम सिनेमापासून घेतली होती, तो ‘द ग्रेट इंडियन किचन’सुद्धा आपल्याकडे बऱ्याच जणांनी आधीच पाहिला होता. त्यावर पुरुषी मानसिकतेचा स्वीकार करणाऱ्या सर्वांच्याच प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होत्या. पण ‘मिसेस.’ आणि ‘द ग्रेट इंडियन किचन’ ही उदाहरणंही तोकडी वाटतील अशी एक मल्याळम फिल्म २०२३ मध्ये येऊन गेली होती, तिचं नाव आहे ‘जय जय जय जय हे’.
सिनेमा सुरू होतो तेव्हा आपल्याला ‘जयाभारती’ या मुलीचं बालपण अगदी काही क्षणचित्रांमध्ये दिसतं. त्यात तिचं आणि तिच्या भावाचं बालपण किती वेगळं होतं हे कळतं. मुलगी म्हणून तिला कसं सतत दुय्यम वागवलं गेलं. तिला या सगळ्यात निवडीचा कसलाच अधिकार मिळाला नाही. हे सगळं काही आपल्याला पाच मिनिटांच्या आत, कसलाही ड्रामा किंवा लादलेलं नरेशन न करता सिनेमा दाखवतो. हा सिक्वेन्स म्हणजे दृश्यांचं सुंदर मिश्रण आणि त्यातून संदेश याचं उत्तम उदाहरण आहे. एका क्षणी जयाची मैत्रीण तिला तिच्या भावाचं नाव विचारते आणि पुढच्याच प्रसंगात जया पाठमोरी वळते, ज्यात तिने भावाच्या नावाची जर्सी घातली आहे. त्यामुळे त्याचं ‘जयम’ हे नाव कोणाला सांगावंही लागत नाही. अशाच छोट्या छोट्या प्रसंगांमधून आपल्याकडे मुलगी कशी वाढवली जाते, हे दिसतं.