
‘देश बदल रहा है, नया भारत, विकसित भारत’ अशी कोणतीही घोषणा न देता भारताचं परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंधांकडं पाहण्याचा दृष्टिकोन, जागतिकीकरणाशी व्यापक स्वरूपात जोडलं जाणं अशा अनेक अंगांनी एक मोठे वळण आणणारा भारत-अमेरिका नागरी अणुकरार तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी साकारला, त्याला २० वर्ष अर्थातच दोन दशकं होताहेत. त्या एका पावलानं भारताला ‘एनपीटी’वर सही न करताही अण्वस्त्रधारी देश म्हणून मान्यता देतानाच भारताच्या अणुकार्यक्रमावरील बंधनं हटवण्याला अमेरिकेनं मान्यता दिली आणि पाश्चात्त्य जगाशी भारताचे संबंध नव्या संदर्भात साकारू लागले.
भूमिकांमध्ये बदल
शांतपणे उचलेलं एक धाडसी पाऊल काय काय घडवू शकतं याचं हे उदाहरण. रोज जग जिंकल्याच्या आरोळ्या मारल्यानंतर प्रसंग पडला, तेव्हा कोणीच साथीला उभं राहत नाही याचा ताजा दुखरा अनुभव समोर असताना हे अधिकच ठळकपणे जाणवणारं. या दोन दशकांत अमेरिका बदलली, जगाची भू - राजकीय समीकरणं बदलली, चीन, रशिया यांच्या धोरणात मोठे बदल झाले, भारतातही केवळ व्यापक राजकीय बदल झाले नाहीत तर ज्यांना अमेरिकेशी मैत्री म्हणजे सार्वभौमत्व गहाण टाकणं वाटत होतं, तेच अमेरिकी अध्यक्षांशी व्यक्तिगत मैत्री, केमिस्ट्रीचे दाखले देऊ लागले. अणुकरार हाणून पाडण्यासाठी आकाश-पाताळ एक करू पाहणारे आपली भूमिका विस्मरणात टाकू लागले.