
प्रशांत ननावरे
nanawareprashant@gmail.com
एखादा ब्रॅन्ड तयार करणं हल्ली खूप सोप्प झालं आहे. भरमसाठ पैसे खर्च करून व्यवस्थापन क्षेत्रातील मोठ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं की विविध माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता आणि निदान व्हर्च्युअल जगात का होईना तुमचा बोलबाला होऊ लागतो. मार्केटींगच्या असंख्य क्लृप्त्या वापरून चर्चेत राहता येतं; पण या क्लृप्त्या फार काळ तग धरत नाहीत.
शेवटी तुम्ही लोकांना काय दर्जाची वस्तू देताय यावर तुमची विश्वासार्हता आणि व्यवसायाची भरभराट अवलंबून असते. उरणमधील गणेश मंदिर चौकातील अडीचशे वर्षे जुन्या गणपती मंदिराच्या शेजारी असलेले ‘आनंद भुवन’ हे छोटेखानी हॉटेल त्याच्या मुख्य नावापेक्षा ‘साठे फरसाण मार्ट’ याच नावाने अधिक परिचित आहे. तीन पिढ्यांचा हा छोटेखानी व्यवसाय उरणच्या वेशीबाहेर किंवा कोणत्याही समाजमाध्यमांवर त्यांचा बोलबाला नसला तरी गेली ७२ वर्षे उरणकरांच्या आणि बाहेरून उरणमध्ये येणाऱ्यांच्या मनात घर करून आहे.