
विवेक प्रभाकर सिन्नरकर
थोरांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा पुरातन काळापासून आहे. आजही ती पाळली जाते. शिवाय यादिवशी शोभायात्रा काढल्या जातात. अशा परंपरा हीच आपली भारतीय संस्कृती आहे.
३० मार्च २०२५ यादिवशी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘विश्वावसूनाम’ संवत्सरास प्रारंभ होत आहे. वर्ष प्रतिपदा हा राष्ट्रीय सण आहे. एकूण साठ संवत्सरे असलेले ऋतुचक्र आहे. त्यातील हे ३९वे संवत्सर आहे. संवत्सर म्हणजे आपले एक वर्ष. संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. ‘सम्यक् वसन्ति मासादया: अस्मिन् ।’ (ज्यात मास/ महिना आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असे म्हणतात.) तसेच, गुरूच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा १/१२ अंश काळ म्हणजे एक संवत्सर होय. त्यालाच ‘शक’ म्हणतात. थोडक्यात, ३० मार्च रोजी श्रीमन नृप शालिवाहन शक १९४७ विश्वावसूनाम संवत्सर सुरू होत आहे.