
मध्ययुगात दोन राजांनी, दोन राज्यांनी ठरवलं आणि युद्ध केलं इतक्या सरधोपट, सोप्या गोष्टी होत्या का? तर नाहीच! राज्यांची लष्करी शक्ती, युद्धसामग्रींची (शस्त्रास्त्रे, दारूगोळा, खाणे, इतर आवश्यक वस्तू इ.), औषधोपचार, अंत्यसंस्कार अशा सगळ्याची व्यवस्था करावी लागायची. युद्धं लढली जायची ती शस्त्रांच्या जोरावर. युद्धामध्ये वापरली जाणारी शस्त्रे प्रत्यक्ष युद्धभूमीवर पोहोचण्याआधी त्यामागे एक मोठी आणि समांतर ‘शस्त्रव्यवस्था’ राबत असायची. यामध्ये शस्त्रांसाठी धातू निवडणाऱ्या लोकांपासून ते शस्त्रे घडवणारे, त्यांना धार लावणारे, शस्त्रांची दुरुस्ती करणारे, संरक्षक आयुधे बनवणारे, शस्त्रांवर नक्षीकाम करणारे अशी शस्त्रांवर उपजीविका करणारे अनेक ‘शस्त्रजीवी’ समाज-जाती मध्ययुगीन भारतात अस्तित्वात होते.