

Konkan Houses
esakal
सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com
आज आपण घरं उंच केली; पण आत शिरताना मान खाली करण्याची सवयही कदाचित त्या जुन्या घराबरोबरच गमावली. आपण निसर्गापासून दूर जात गेलो आणि त्याच वेळी स्वतःलाही कदाचित मोठं समजत गेलो. आता पुन्हा मुळांकडे यायचं असेल, तर कदाचित आधी थोडंसं वाकावं लागेल.
कणात पाऊस प्रचंड कोसळतो. दरवर्षीचंच आहे ते. नवं नाही त्यात काही. त्या पावसाला ध्यानात घेऊनच कोकणात घरं बांधली जात होती. आधीच्या कोकणातल्या घरात शिरायचं म्हणजे मान खाली वाकून आत शिरावं लागत होतं. ‘असं का?’ हा प्रश्न मनात छळत होता.
माणूस जसजसा मोठा होत जातो, तसतसा तो कोडगा होत जातो की काय, अशी शंका मनात येते. त्याला निमित्तही तसंच. ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान ज्या वेगाने वाढलं, त्याच वेगाने ‘असं का’ हे विचारणारी जमात कमी झाल्यासारखं वाटू लागतं. आजूबाजूला पाहिलं की जाणवतं, ‘असं का’ विचारणारे लोक जिथे नाहीत, तिथे तंत्रज्ञान असूनही अज्ञानामुळे लोकांची विचारसरणी वर्तमानाशी सुसंगत राहिलेली नाही.
लहानपणापासून मे महिन्याच्या सुट्टीत, महाशिवरात्रीला, होळीला गावी जायचो. प्रत्येक वेळी गावातील घर आणि आजूबाजूला निसर्ग वेगवेगळा भासलेला आहे. गावातील घरं ही तिथल्या निसर्गाचा विचार करून आधीपासून बनवली गेली असावीत, हे कळायला जरा उशीर झाला. जोपर्यंत घरं कौलाची होती आणि त्याची रचना आपण लहानपणी काढलेल्या निसर्गचित्रासारखी होती, तोपर्यंतच घरात शिरताना मान खाली करावी लागत होती.