
मृणाल तुळपुळे
...ती कोकणी मुलगी नेहमी बांगड्याची चटणी करायची. त्यासाठी ती बांगड्यांना हळद व मीठ लावून, ते जाळीवर ठेवून भाजून घ्यायची. भाजलेले सुके खोबरे, लाल मिरच्या, भरपूर लसूण व मीठ असे पाट्यावर भरड ठेचून घ्यायची. गार झालेल्या बांगड्यातले काटे काढून ते ठेचलेल्या मसाल्यात अलगद मिसळायची. तिच्या हातची तांदळाची गरम भाकरी व बांगड्याची चटणी म्हणजे मेजवानीच असायची.
कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते सुंदर समुद्रकिनारे, माडापोफळीच्या बागा, त्यातून जाणारे वळणावळणाचे रस्ते, प्राचीन मंदिरे आणि अर्थातच मासे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणची खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे... समुद्र आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित अशी ही खास खाद्यसंस्कृती. मासे हा कोकणी खाद्यसंस्कृतीमधील प्रमुख पदार्थ आणि कोकणाची सांस्कृतिक ओळख, उदरनिर्वाहाचे साधन व पारंपरिक पद्धतींचा एक महत्त्वाचा भागदेखील आहेत.