
आमच्या झेंडावंदनासाठी मिरवणूक निघाली तेव्हा पोलिसांनी एकामागे एक अशा चार फळ्या केलेल्या आम्हाला दिसल्या. सर्व पोलिसांच्या हातात लाठ्या होत्या; पण ‘देपिवलीच्या शाळेकडेच जायचं’ असा निर्धार ठाम होता. अखेर पोलिसांच्या चारही फळ्या संघटनेने तोडल्या आणि आनंदाच्या बेहोशात उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्याची गीतं सुरू झाली.
ठरल्याप्रमाणे १५ ऑगस्टच्या झेंडावंदनासाठी वाजत-गाजत मिरवणूक निघाली खरी; परंतु माझ्या आणि विद्युल्लताच्या डोक्यात एकच काहूर माजला होता, की पुढे काय होणार? आपल्यासोबत चार-पाचशे लोक आहेत. पोलिस लाठ्या, बंदुका यांच्यासह सज्ज आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज केला तर? आपले लोक जखमी झाले तर? पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात कुणी दगावलं तर? हे सारेच आपली जबाबदारी आहेत. आपल्यावर विश्वास ठेवून हे रस्त्यावर संघर्षाकरिता उतरलेत. त्यांच्या आमच्यावरील अपरिमित विश्वासाच्या ओझ्याने आम्ही दबून गेलो. काय होऊ शकतं याचा आम्ही अंदाज बांधू लागलो.
लोकांना या पद्धतीचा संघर्षही नवीन आहे, शांततेने सारं होईल ना? आपण सांगितलेले आदेश हे सारे पाळतील की नाही, की पळून जातील? पोलिसांनी त्यांना हुसकावलं, बळाचा वापर केलाच, तर हे सारे दगडफेक करणार तर नाहीत ना? एक ना अनेक विचारांनी आमच्या डोक्यात थैमान घातलं. निर्दयी सरकार काहीही करू शकतं. त्यात मालक आणि सरकार एक झालेले आहेत. मालकांचा संघटनावाढीला विरोध आहेच आणि सरकारलाही संघटनेची वाढ नकोय. मिरवणुकीचं निमित्त घेऊन संघटना नष्ट करण्याचा प्रयत्न सरकार करील. आपण त्याला कसं तोंड द्यायचं? असे अनेक विचार आम्हाला अस्वस्थ करीत होते.