
Trump Gaza proposal
esakal
हमासला संपवण्याचा इस्राईलनं निर्धार केला, त्यात गाझा पट्टीची धूळधाण झाली आहे. हमासचं कंबरडं मोडणारं नुकसान इस्राईलनं जरूर केलंय पण त्यात हजारो सामान्यांचा बळी पडला. संयुक्त राष्ट्रांच्या समितीनं त्याची वंशसंहार अशी निर्भत्सना केली, तरीही इस्राईलची कारवाई मात्र थांबली नाही आणि आता केवळ हमासला संपवणं नव्हे तर गाझा पट्टीच ताब्यात घेण्याच्या दिशेनं इस्राईल पावलं टाकू लागला आहे. पुढं पश्चिम किनारपट्टीही ताब्यात घ्यायची भाषा बोलली जाऊ लागली, तेव्हा मात्र जगातील अनेक देशांनी, खास करून युरोपातील देशांनी आता बस्स झालं, अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि इस्राईलच्या पाठीशी ठाम राहिलेल्या अमेरिकेलाही इस्राईलचं असं नको तितकं ताणणं, आपल्या पश्चिम आशियातील हितसंबंधांवर विपरीत परिणाम करणारं ठरू शकतं, याची जाणीव होऊ लागली. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात कधी नव्हे इतक्या देशांच्या प्रतिनिधींनी पॅलेस्टाईनच्या बाजूनं उघड भूमिका घेतली. इस्राईलच्या गाझातील लष्करी दमनचक्रावरचा रोष इतका होता, की इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू बोलायला उभे राहिले, तेव्हा समोरून निघून जाणारी विविध देशांच्या प्रतिनिधींची रांगच लागली.