
अरविंद रेणापूरकर
arvind.renapurkar@esakal.com
गेले एक-दोन आठवडाभर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टेरिफ कार्ड’ची जगाने धास्ती घेतली. म्हणूनच सातत्याने शेअर बाजारात चढउतार पाहावयास मिळाला आणि पुढेही काही दिवस दिसू शकतो. अमेरिका फर्स्ट धोरणानुसार ट्रम्प यांनी देशनिहाय आयात शुल्क लागू केले आणि त्याचा परिणामही वेगवेगळा दिसणार होता. भारताचा आणि त्यातही वाहन उद्योगाचा विचार केल्यास ट्रम्प यांनी २६ टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. साहजिकच संभाव्य परिणामांचे आकलन केले गेले.
आपल्या कंपन्या अमेरिकेला पॉवरट्रेन पार्ट्स, ट्रान्समिशन, चासी, इंजिन, इलेक्ट्रिकलच्या सुट्या भागांबरोबरच तयार मोटारींची निर्यात करतात. त्यामुळे नेमके काय होणार, याची कोणालाच कल्पना नसल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली. परिणामी, कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येण्यास तयार नव्हते; परंतु मागच्या वर्षी भारतीय बनावटीची वाहने आणि सुट्या भागांच्या निर्यातीचे प्रमाण पाहिल्यास आणि ट्रम्प यांनी पुन्हा शुल्कवाढीची कुऱ्हाड उगारल्यास आपल्या निर्यातदारांवर होणारा परिणाम हा कमीच राहील आणि तसे भाकीतही ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ यांनी केले होते.