
तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांंनी कायम कट्टरवादी धार्मिक भूमिका व सत्ताकेंद्री राजकारण यांचे मिश्रण करून सत्तेत राहण्यात अन् प्रादेशिक वर्चस्व प्रस्थापित करण्याला कायम प्राधान्य दिले आहे. मुस्लिम जगताचे नेतृत्व करण्याच्या सुप्त महत्त्वाकांक्षेमुळे पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे धोरण तुर्कियेचे आहे.
हलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये उफाळलेल्या संघर्षातून अनेक देशांचे परराष्ट्र धोरण, त्याचे ताणेबाणेदेखील समोर आले आहेत. या सर्व संघर्षादरम्यान तुर्किये आणि अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांची भूमिका अधोरेखित झाली आहे. या युद्धात तुर्कियेने भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानला लष्करी मदत म्हणून ड्रोन्सचा पुरवठा केला.
एर्दोगान यांनी २००३ मध्ये पंतप्रधान आणि २०१४ मध्ये थेट निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तुर्कियेतील लोकशाही विरोधकांचे स्थान कमजोर केले व आपले वर्चस्व वाढवले आहे. एर्दोगान यांनी तुर्कियेला एक प्रादेशिक तसेच जागतिक शक्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः इस्लामी शक्तींना मजबूत करण्याच्या नावाखाली त्यांनी हमास, हिजबुल्ला, हरकत उल मुजाहिदीन (पाकिस्तान) यांसारख्या दहशतवादी गटांना मदत केली आहे. नाटो संघटनेत असूनही त्यांनी रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी केली, स्वीडनच्या नाटो सदस्यत्वावर आक्षेप घेतला आणि रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करण्यासाठी मदत केली.