
उबुंटू म्हणजे, ‘मी आहे कारण आपण आहोत.’ अत्याधुनिक ‘एआय’ मानवजातीच्या अस्तित्वाला किंवा स्थैर्याला धोका निर्माण करत असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. सगळेच नष्ट झाल्यास मी देखील संपलो. दक्षिण आफ्रिकेने वर्णभेद आणि शस्त्रास्त्रांना नाकारलं, त्याप्रमाणेच ते ‘एआय’मधील वर्णभेदालाही नाकारतील, अशी आशा आहे.
कगलेमा मोतलांथे हे दक्षिण आफ्रिकेतील एक अत्यंत सन्माननीय वयोवृद्ध नेते आहेत. पंधरा वर्षांपूर्वी ते या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. ते कालच्या पिढीचे प्रतिनिधी असले, तरी त्यांचे विचार उद्याच्या पिढीबद्दलच असतात. जोहान्सबर्गमध्ये त्यांची एक संस्था आहे, जी गरीब भागांतील शालेय मुलांना डिजिटल कौशल्यं शिकवते. या संस्थेमध्ये मुलांना रोबोटिक्स आणि कोडिंग शिकवलं जातं. ही १४-१५ वर्षांची मुले आणि मुली या संस्थेत जमतात, तेव्हा त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. आता या मुलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिकवण्याचा पुढचा टप्पा सुरू आहे. त्यांचे मित्र मॅथ्यूज फोसा यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तेही मोतलांथेसारखेच स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे होते.