
गेल्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात जनता आणि जनतेतून निर्माण झालेले नेते यांना अभिरुची अन् नागरिकशास्त्र यांचे धडे कोणीच कसे दिले नाहीत? प्रत्यक्ष समोर हत्या केली, की ती करणारा पकडला जातो. परंतु, जिथे हत्या करणारा समोर दिसत नाही; पण निष्पाप जीव आपले जीवन हकनाक गमावून बसतात अशा अदृश्य गुन्हेगारांना कोण आणि कशी शिक्षा देणार? याच्यासाठी कायदा तरी कुठला?
तेच ते, नि तेच ते! तेच प्रश्न, तेच खड्डे! जनसामान्यांच्या स्वप्नाच्या पायऱ्या करून उंच गेलेले सूत्रधार, त्यांचे आयुष्य धुळीत मिळताना, नवे प्रश्न निर्माण करीत त्या धुरळ्यात आधीचे प्रश्न कसे गोठवून टाकता येतील नि निरपराधांच्या मरणाचेही सत्ताकारणासाठी राजकारण कसे करता येईल, हेच पाहत पाहत आपली लोकशाही सहस्रचंद्रदर्शनाकडे निघाली आहे. तक्रार तरी कुणाकडे करायची नि ती केली तर ती करणाराच भोवऱ्यात येईल अशा स्थितीत, ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ म्हणत तो अचानकच नि गेल्या शंभर वर्षांत इतका मुसळधार झाला नव्हता, असे पावसावरच खापर फोडत, किती जणांच्या गेलेल्या प्राणांचे आणि घुसमटींचे आपण समर्थन करणार आहोत कोण जाणे! जुने खड्डे अधिक खोल करीत, नव्या खड्ड्यांना जन्म देत, पुन्हा त्यात किती जीव गेले याची मोजदाद तरी कोण करणार!