

urban political economy
esakal
शहरी राजकारणाचे स्वरूप काही दशकांपासून बदलण्यास सुरुवात झाली असून, त्यामध्ये राजकीय अर्थकारण हा घटक महत्त्वाचा आहे. राजकीय अर्थकारणामुळे महाराष्ट्रातील शहरातील सत्ताकेंद्रांवर अभिजात वर्गाचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे.
राजकीय अर्थकारण शहरांना आणि शहरी राजकीय प्रक्रियांना आकार देते. एवढेच नव्हे तर राजकीय अर्थकारण ही शहरी, निमशहरी आणि ग्रामीण राजकीय प्रक्रियेची रक्तवाहिनी आहे. राजकीय प्रक्रियेच्या हृदयाला अर्थपुरवठा (रक्तपुरवठा) राजकीय अर्थकारण करते. या राजकीय अर्थकारणाच्या तत्त्वानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात शहरांच्या विकासावर भर देण्यात आला. ‘सिटी इकॉनॉमिक रिजन्स’ची तरतूद केली गेली. यासाठी पाच केंद्रांची निवड झाली. विशेषतः त्यामध्ये पुणे परिसराचा समावेश आहे. म्हणजेच थोडक्यात पुणे परिसरावर राजकीय अर्थकारणाचा खूप खोलवर परिणाम होत आहे. तसेच शहर व निमशहर यांना एकात्मिक शहर प्रदेश म्हणून विकसित केले जाईल. या शहरांसाठी जलदगती रेल्वे कॉरिडोर विकसित केले जातील. मुंबई-पुणे, हैदराबाद-पुणे अशा सात हायस्पीड रेल्वेचे जाळे म्हणजे विकासाचे प्रारूप. अशा प्रकारच्या राजकीय अर्थकारणाची सुरुवात सत्तरीच्या दशकात जागतिक पातळीवर झाली होती. तेव्हापासून शहरी राजकीय अर्थकारणाची कथा घडत आलेली आहे.