
इराण आणि इस्राईलमधील युद्धाचा भडका १४ जूनला उडत असताना मागील काही वर्षांपासून अमेरिकेत वाहणाऱ्या वैचारिक आणि राजकीय ध्रुवीकरणाच्या सुप्त प्रवाहांचे परिवर्तन एका वादळात झाल्याचे निश्चित झाले. या वादळाचा प्रभाव फक्त अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात आणि भारतावरही दिसण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकन सैन्याच्या २५०व्या वर्धापन दिनानिमित्त १४ जूनला वॉशिंग्टन डीसीमध्ये पथसंचालनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दिवशी राष्ट्रपती ट्रम्प यांचा वाढदिवसही होता आणि तब्बल २००० ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात ‘नो किंग्स’ हे बॅनर झळकावत निदर्शने सुरू होती. याच वेळी अमेरिकेच्या उत्तरेकडील मिनेसोटा राज्यामधील दोन डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रांतीय लोकप्रतिनिधींवर त्यांच्या घरात गोळीबार झाला, ज्यापैकी एक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या जोडीदाराचा मृत्यू झाला. तिकडे युटा राज्यातही निदर्शनामध्ये एका व्यक्तीचा चुकून गोळी लागून मृत्यू झाला.
१४ जूनच्या आधीच्या आठवड्यात लॉस एंजेलिसमध्ये ट्रम्पविरोधी दंगलींमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. राजकीय आणि वैचारिक मतभेदांमुळे दोन्ही मुख्य पक्षांच्या लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, आणि सामान्य व्यक्तींच्या विरुद्ध हिंसा, जाळपोळीच्या घटना मागील काही वर्षांपासून दिसून येत होत्या, त्यांनी त्या दिवशी एक चिंताजनक पातळी गाठली.