

Do Aankhen Barah Haath analysis movie
esakal
कौटुंबिक चित्रपट, गुन्हेगारी विश्वाचं दर्शन, रोमँटिक संगीतमय चित्रपट, नव्या प्रणयी जोड्यांची जुळवाजुळव अशा काळात व्ही. शांताराम स्वतः एक प्रौढ नायक म्हणून उभे राहिले. गुन्हेगारांना बंदिवान न करता मुक्त जीवन जगण्याची संधी द्यायला हवी, असा नुसता विचारच नव्हे तर सामाजिक प्रयोग महाराष्ट्रात झाला होता. त्या घटनेवर ‘दो आँखे बारह हाथ’ घेऊन आले आणि तरुणाई मात्र देव आनंद-नूतनच्या ‘छोड दो आँचल’वर जीव टाकत होती...
मुंबईच्या हिंदी चित्रपटांच्या रांगेत आता दाक्षिणात्य निर्माते-दिग्दर्शकही हजेरी लावत होते. मद्रासच्या ए.व्ही.ए. प्रॉडक्शन्सच्या वर्ष ५७ मधला ‘मिस मेरी’ पाहा. मीनाकुमारी, जमुना, जेमिनी गणेशन, किशोरकुमार आणि एम. करुणानिधी- होय तमिळनाडूचे दोन दशके मुख्यमंत्री म्हणून गाजलेले राजकारणी, लेखक, कलाकार एम. करुणानिधी हे ‘मिस मेरी’मध्ये दिसतात, एका छोट्या भूमिकेत! चित्रपट हा विनोदी, दाक्षिणात्य छाप असलेला; पण विशेष म्हणजे हेमंतकुमार यांच्या ‘बंगाली मिठाईच्या गोडीचं’ संगीत असं रसायन आहे. ट्रॅजेडी क्वीन म्हणून मीनाकुमारी पुढे ओळखली गेली तरी अतिशय हलक्याफुलक्या भूमिकेत ती इथं दिसते.