बेवारस मृतदेहांना आपुलकीने निरोप देणारे चाचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharif chacha}

बेवारस मृतदेहांना आपुलकीने निरोप देणारे चाचा...

गणाधीश प्रभुदेसाई

आज काल मयतीला चार खांदे मिळणे अवघड झाले आहे. शववाहिनितून मृतदेह उतरवून घ्यायलाही बरोबर कोणी नसतो, हे दृश्‍य स्मशानभूमीत बऱ्याचदा पाहायला मिळते. पण अयोध्येतील महम्मद शरीफ ऊर्फ शरीफचाचा यांचे कार्य अनुकरणीय असून त्यांच्या सेवेच्या व कार्याचा गौरव भारत सरकारने २०२० मधील पद्मश्री देऊन केला आहे. तुम्हाला प्रश्‍न पडणार की असे काय केले आहे शरीफचाचांनी जेणेकरून त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कार्य जाणून घेतले तर तुम्ही थक्क व्हाल. जगात समाजासाठी वेगळा विचार करणारी लोकं अजूनही आहेत हे पाहून बरं वाटतं. सायकल दुरुस्तीचे दुकान चालविणारा एक व्यक्ती एवढे उत्तुंग कार्य करू शकतो व त्याच्या कार्याची दखल भारत सरकारला घ्यावी लागते, हे पाहून आश्‍चर्य वाटते. ‘लावारिस लाशों के मसीहा’ असं शरीफचाचांना म्हटलं जातं. यावरून तुम्हाला त्यांच्या कार्याची जाणीव झाली असावी. त्यांनी अयोध्या येथे आत्तापर्यंत एक, दोन, नव्हे तर २५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गेल्या २५ वर्षांत त्यांनी तब्बल २५ हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. तीस वर्षांपूर्वी शरीफचाचांच्या मुलाचा रस्‍ता अपघातात मृत्यू झाला व त्याच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व तेव्हापासून बेवारस मृतदेहावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.

केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांचे पत्र आलं व त्यात पद्मश्री सन्मान मिळाल्याचे कळलं. फैजाबाद येथील भाजप खासदार लल्लू सिंह यांनी त्यासाठी शिफारस केली होती. २०१९ मधील पद्मश्री सन्मान त्यांना मिळाल्याची घोषणा झाली होती. पण कोरोना महामारीमुळे त्याचे वितरण झाले नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थितीही ठीक नव्हती, शिवाय त्यांची तब्येतही खालावली होती. त्यामुळे त्यांचे कुटुंब काळजीत होते. काही महिने त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कुटुंबाजवळ पैसेही नव्हते. कर्जाचा डोंगरही वाढत होता. त्यांचा मुलगा गाडी चालवून घर चालवतो. शरीफचा समाजकार्यात अडकल्यानंतर संसाराची गाडीही पटरीवरून घसरली.

त्यांच्या तीन मुलापैकी एकाने सायकल दुरुस्तीचे, दुसऱ्या मुलाने मोटारसायकल दुरुस्तीचे व तिसऱ्या मुलाने ड्रायव्हरची नोकरी धरली. शरीर झाकायला कपडे नाहीत, खायला भाकर नाही, घरावरचे छप्पर नक्की नाही अशी अवस्था असताना बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कान शरीफचाचांनी अविरत सुरू ठेवले. बेवारस मृतदेह शोधण्यासाठी ते रुग्णालये, पोलिस ठाणी, रेल्वे स्थानके तसेच मठांमध्ये नियमीत जातात. जर मृतदेहावर कुणी ७२ तांसांच्या आत दावा केला नाही तर सरकारी अधिकारी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शरीफचाचाकडे सुपूर्द करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अभिनेता अमीर खान यांनी त्यांना ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात बोलाविले होते. त्यावेळी शरीफचाचांची कहाणी ऐकून सर्वजण हळहळले होते. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना कफन व इतर आवश्‍यक वस्तू ते स्वतः पदरमोड करून आणतात.

घरखर्च भागविणे कठीण
शरीफचाचाच्या मुलाने सांगितले की, तो चालक म्हणून काम करतो व त्याला महिना सात हजार रुपये मिळतात. त्यातले शरीफचाचाच्या उपचारावर व औषधपाण्यावर सुमारे चार हजार रुपये खर्च होतात. एक एक दिवस घालविणे कठीण होऊन जातं. पैशांची चणचण असल्यामुळे शरीफचाचांवर योग्य उपचारही करणे शक्य होत नाही. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मान स्वीकारल्यानंतर अयोध्येत परतल्यानंतर शरीफचाचांचे भव्य स्वागत करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शरीफचाचांनी सांगितले की, मोदी सरकार समाजासेवकांची दखल घेत आहे हे समजले. पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपतींनीही माझ्या कामाची प्रशंसा केली. इतक्या वर्षांच्या तपश्‍चर्येचे फळ मला मिळाले आहे. जोपर्यंत शरीरात बळ आहे तोपर्यंत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरूच ठेवणार. कुटुंबातले सदस्यही माझे हे कार्य पुढे चालूच ठेवणार असा विश्‍वासही शरीफचाचांनी व्यक्त केला.

परिवाराला अपेक्षा पेंशनची
शरीफचाचांची आर्थिक परिस्थिती इतकी हालाकीची आहे की आता सरकारकडून त्यांना पेंशनची अपेक्षा आहे. पेंशन मिळाले तर शरीफचाचांवर उपचार करणे शक्य होणार आहे. शहीद शोध संस्थानतर्फे त्यांना ‘माटीरत्न’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पण आज त्यांच्या कुटुंबाला खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची. एकाबाजूला आर्थिक चणचण व दुसऱ्या बाजूला खालावत जाणारी तब्येत याला सामोरे जाण्याची वेळ कुटुंबावर आली आहे.

फक्त आश्‍वासने
पद्मश्री सन्मान मिळाल्यानंतर शरीफचाचांच्या मोडकळीस आलेल्या घरी सामाजिक कार्यकर्ते, सरकारी डॉक्टर, स्थानिक नागरिक तसेच राजकीय पुढारीही येऊ-जाऊ लागले. शरीफचाचांसाठी निधी गोळा करण्याचे व राज्य सरकारतर्फे शरीफचाचांना मासिक भत्ता व रेशन देण्याचे आश्‍वासन आमदार वेद गुप्ता यांनी दिले होते. माजी मंत्री नारायण पांडे यांनीही आर्थिक मदत केली व क्राउडफडिंग करण्याचे आश्‍वासन दिले होते. फैजाबाद येथील बीजेपी खासदार लल्लू सिंह यांनी सांगितले की, मी आर्थिक मदत व उपचारासाठी पुढाकार घेणार.
काळातंराने डॉ. वैभव शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथकाने शरीफचाचांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली व सर्व मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. फैजाबाद येथील मोहल्ला खिरकी अली बेग येथे ते एका भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांचे मुलगे शागीर व अशरफ यांनी सांगितले की ते दोघे थोडेफार कमवता, पण त्यातून घराचा खर्च कसाबसा चालतो.
शरीफचाचांची तब्येत सध्या खूप खालावली आहे. ८४ वर्षीय शरीफचाचांचा कमरेखालचा भाग लुळा पडला आहे. त्यांना उठायला व बसायलाही दुसऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. शरीराने ते पूर्णपणे थकले आहेत.

डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना लखनौ येथील न्यूरो सर्जन स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला आहे. पण आता त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा अयोध्येमध्येच उपचार व्हावी अशी आहे.
प्रशासनाने शरीफचाचांवर लखनौमध्ये उपचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण, अयोध्येतच उपचार झाले तर बरं होईल असं मुलगा मोहम्मद सगीर यांचं म्हणणं आहे. शरीफचाचा यांचा ‘एक सायकल दुरुस्ती करणारा ते पद्मश्री सन्मान विजेता’ हा प्रवास थक्क करणारा आहे, हे मात्र नक्की. मात्र आता उतारवयात त्यांना सरकारने सर्वोतोपरी मदत करणे तितकेच गरजेचे आहे. मृतांचा शेवटचा प्रवास व्यवस्थित होण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या शरीफचाचांची आयुष्याची संध्याकाळ सुखकर जाण्यासाठी सरकारबरोबर समाजानेही पुढे येणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top