

Varhadi Language and Culture
esakal
किशोर बळी - sakal.avtaran@gmail.com
वऱ्हाडीचे शब्दभांडार अतिशय समृद्ध आहे. एखादी गोष्ट खूप आवडली तर ही आवड व्यक्त करण्यासाठी काही खास शब्दांची योजना वऱ्हाडीत करतात. जसे - भाजी कशी झाली हे सांगावयाचे असेल तर - ‘सनान!’, मुले गोंधळ करीत असली तर ‘दांगळो नोका करू बे!’ अशी सूचना.
बोली ही आपली अस्सल अभिव्यक्ती आहे. बोलीचा संबंध गाव-खेड्याशी, वाड्या-वस्त्यांशी, शेती-मातीशी आहे... नात्या-गोत्यांशी आहे. सण-उत्सवांशी आणि एकूणच लोकसंस्कृतीशी आहे. म्हणून हा ठेवा आपण जपला पाहिजे. त्याचे मूळ समजून घेतले पाहिजे. तो वृद्धिंगत केला पाहिजे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी विदर्भ प्रांत हा मध्य प्रांतात येत असे. त्यामुळे स्वाभाविकच विदर्भातील भाषेवर उर्दू - हिंदी भाषेचा प्रभाव आढळतो. यातील काही भाग प्राचीन विदर्भात समाविष्ट होता. अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर ही प्राचीन विदर्भाची राजधानी होती. त्यावेळी नर्मदा नदीपासून कृष्णेच्या खोऱ्यापर्यंत आणि खानदेश ते कोसल म्हणजे छत्तीसगडपर्यंतचा मुलुख विदर्भात येत होता. प्राचीन काळात ‘विदर्भ’ नावाचा राजा या प्रांतात राहत असल्यामुळे त्याला ‘विदर्भ’म्हणून ओळखले गेले, असा संदर्भ सापडतो. विदर्भ नावाच्या राजाने या प्रदेशात आर्यांची वसाहत केली, त्यावरूनच या प्रदेशास ‘विदर्भ’ हे नाव दिले गेले असावे, अशी आख्यायिका आहे. यदुवंशाच्या भोज नामक शाखेचा प्रमुख ऋषभदेव याचा पुत्र विदर्भ असल्याचे भागवत पुराणात म्हटले आहे. त्याला हा प्रदेश मिळाल्याने विदर्भ हे नाव मिळाले असावे, असे सांगितले जाते.
मराठी आमुची भाषा
वऱ्हाडी आमुची बोली
मराठी आमुची उंची
वऱ्हाडी आमुची खोली