

Social Work Journey
esakal
विवेक पंडित - pvivek2308@gmail.com
‘वाटेवर काटे वेचीत चाललो’ या लेखमालेतील हा अखेरचा लेख. ही लेखमाला २७ जुलै २०२४ रोजी सुरू झाली. तेव्हापासून माझा हा संवाद ‘सकाळ’च्या तुम्हा साऱ्या वाचकांशी अखंड सुरू आहे. मी समाजात काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे, तरीही मला हा संवाद तुम्हा साऱ्यांशी का करावासा वाटला? यामागचा माझ्या मनातला विचार मला या सदराच्या अखेरच्या लेखात सांगावासा वाटतोय... या सदराचं नाव ठरवण्याचं स्वातंत्र्य ‘सकाळ’ वृत्तसमूहाने मला दिलं होतं आणि सहजच कवी अनिल यांच्या कवितेच्या ओळी मनात गुणगुणल्या गेल्या... ‘वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुलाफुलांत चाललो’... या ओळींतील अर्थाचं साधर्म्य माझ्या आजवरच्या प्रवासाशी वाटलं.
१९७८ पासून १९९६ पर्यंतचा फक्त अठरा वर्षांचा प्रवास मी या १०४ लेखांत मांडू शकलो. हा प्रवास खरं तर माझा नव्हताच. तो संघटनेचा प्रवास आहे; कारण सामान्यतः वयाच्या विशीत आपला स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रवास सुरू होतो, असं मानलं; तर माझं संघटना-बांधणीचं काम यादरम्यानच सुरू झालं. त्यामुळे संघटनेच्या जडणघडणीची ही उजळणी आहे. माझं व्यक्ती म्हणून जे काही भलंबुरं झालं, ती सारी माझ्या जडणघडणीची जंत्री म्हणजे संघटनेच्याच जडणघडणीची जंत्री आहे... कारण मी संघटना - समर्थन - विधायक संसद यापासून पृथक असा कधी जगलोच नाही. आज वयाच्या सत्तरीतही नाही. या मागच्या ५० वर्षांच्या काळात मी काटे वेचीत राहिलो... वेदना शोधत-ऐकत राहिलो... कधी त्या काट्यांची फुलं करण्याची ताकद त्या सर्वशक्तिमान ऊर्जेने मला दिली; तर कधी काटे अंतरात खोलवर फक्त बोचत-टोचत राहिले.
ज्या आदिवासींमध्ये मी जगलो-जगतोय त्यांच्या जमातीमध्ये साळिंदराबद्दल एक आख्यायिका आहे... पूर्वी जंगलात सर्व प्राणी एकोप्याने राहत होते. कालांतराने बलवान प्राणी लहान प्राण्यांवर अन्याय करू लागले. मग वनदेवतेने प्रत्येक प्राण्याला रक्षणासाठी काही ना काही वरदान दिलं. हरणाला वेग दिला, वानराला उंच झाडावर चढण्याची कला दिली, पक्ष्यांना पंख दिले, तसेच साळिंदराला अंगभर काटे दिले. मात्र हे देताना वनदेवतेने साळिंदराला सांगितलं, ‘तू या काट्यांनी कधीच कोणावर हल्ला करू नकोस, तुझ्यावर संकट आलं; तर शरीर गोलाकार करून या काट्यांनी स्वतःचं रक्षण फक्त कर.’ तेव्हापासून साळिंदर हे शांत स्वभावाचं झालं... सत्य असं आहे, की साळिंदर कोणावर काटे फेकत नाही; परंतु हल्लेखोराने त्याच्या काट्यांना स्पर्श केला तर ते त्याच्या शरीरातून सुटून समोरच्याच्या अंगात रुततात... मी वाटेवरले जे जे काटे आपलेसे केले ते ते कोरड्या व्यवस्थेच्या, बाहेरच्या निराशाजनक परिस्थितीच्या, दररोजच्या वंचिताच्या भुकेच्या, दारिद्र्यामुळे रोज मरणाऱ्या स्वप्नहीन-दिशाहीन समाजाच्या स्पर्शाने साळिंदरासारखे माझ्यातून बाहेर निखळून पडले नाहीत; तर ते माझ्यात अधिक आत आत रुतत गेले... आजही रुतत जाताहेत.