
Aghaat Marathi movie
esakal
माझ्या अभिनय प्रवासात मी अनेक भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेतून मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं. माझा पहिला चित्रपट ‘आघात’ होता, ज्यासाठी मला राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्या सिनेमामध्ये अशोक सराफ, निळू फुले अशी अनेक दिग्गज मंडळी होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते रमाकांत कवठेकर, ज्यांनी ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट केला होता. त्या वेळी चंद्रलेखाचं नाटक आलं होतं. मधुकर तोरडमल लिखित आणि दिग्दर्शित ‘झुंज’ नावाचं. त्यात माझी भूमिका एका दलित मुलाची होती. ती भूमिका पाहून कोणीतरी माझं नाव कवठेकरांना सुचवलं आणि मग तो चित्रपट मी केला. त्या वेळेला मी नोकरी करीत असतानाच मला चित्रपट करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटासाठी आम्ही एका छोट्या गावातील तंबूत राहत होतो. अगदी अशोक सराफसुद्धा. तो सिनेमा ध्येयवादी आणि प्रेरित लोकांवर आधारित होता आणि त्यात माझी भूमिका खूप संवेदनशील होती.
चित्रपटाचा नायक आपल्या कॉलेजमधल्या मित्रांना घेऊन गावात येतो आणि तिथे विहीर खणतो. ही वेगळी विहीर का खणली जाते? तेव्हा शासनाचा नियम होता ‘एक गाव, एक पाणवठा’; पण दलितांना त्या विहिरींमधून पाणी घेण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे माझं कुटुंब भरडलं जातं. या अन्यायाला विरोध म्हणून मी गावात नवी विहीर बांधतो आणि संपूर्ण गावाची तहान भागवतो. असा वेगळा संदेश त्यातून दिला होता.