
Vijaydurg
esakal
आरमार उभारायचे असेल तर सागरी किल्ले अत्यावश्यक आहेत, हे ओळखून शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले आणि जिंकले. त्यापैकीच एक विजयदुर्ग. विजयदुर्ग जिंकून शिवाजीराजांनी परकीय जुलमी सत्तांना आव्हान दिले आणि भूमिपुत्रांना अभय, आत्मविश्वास आणि उत्तम शासन दिले. शिवाजी महाराजांच्या काळात विजयदुर्ग किल्ला जिंकण्यासाठी पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांनी जंग जंग पछाडले; परंतु त्यांना तो जिंकता आला नाही. तिहेरी तटबंदीचा विजयदुर्ग अभेद्य राहिला.
पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांची सागरी दहशत संपविण्यासाठी सागरी दुर्ग ताब्यात असणे आवश्यक आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी अनेक सागरी किल्ले जिंकले आणि बांधले. देशावर निर्धोक राज्य करण्यासाठी त्याच्या लगत असणारा समुद्र आपल्या ताब्यात असला पाहिजे. कारण समुद्र हा दळणवळण, संरक्षण, व्यापार आणि सागरी संपत्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. युरोप आणि आखाती देशांमध्ये वाहतूक आणि व्यापार समुद्रमार्गेच चालत असे. आजही बहुतेक मालवाहतूक समुद्रमार्गेच चालते. आरमार हे संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे. समुद्रातील मीठ आणि मासे हे मध्ययुगातील राज्याच्या उत्पन्नाचा अविभाज्य भाग होता.