

महाराष्ट्र सरकार स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठ स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
ई सकाळ
दृश्यकला शिक्षण, कला विद्यापीठ, Maharashtra Visual Arts University
डॉ. केशव साठये
नव्या शैक्षणिक धोरणामुळे राज्याराज्यांत शिक्षण या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे. अध्ययन –अध्यापन –संशोधन यांविषयीही मोठ्या प्रमाणात मंथन होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार स्वतंत्र ‘दृश्यकला विद्यापीठ’ स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. हा विचार स्तुत्य अहे. ही उभारणी चांगल्या रीतीने व्हावी, यासाठी शास्त्रशुद्ध विचार व्हायला हवा. यानिमित्ताने विद्यापीठाची दिशा, उद्दिष्ट आणि नियोजन कसे असावे, याविषयीचे चिंतन गरजेचे वाटते.
कौशल्यविकास याला आपल्या शिक्षणप्रणालीत महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे. ते कौशल्य त्या, त्या विषयातील तत्वज्ञानाने परिपूर्ण असावे आणि त्याला एक सैद्धांतिक चौकट लाभावी हा उद्देश आपण उच्चशिक्षणात गृहीतच धरलेला आहे. ‘दृश्यकला’ या विषयाला जागतिक बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेता कला हा विषय अधिक सखोलपणे शिकवता यावा आणि त्यातील प्रत्येक घटकांवर परिपूर्ण अध्ययन-अध्यापन व्हावे, हे या येऊ घातलेल्या विद्यापीठाकडून नक्कीच अपेक्षित आहे. उपयोजित चित्रकला ,पेंटिंग, शिल्पकला, वास्तूकला, मनोरंजनविश्वातील दृश्यघटक यांना उर्जितावस्था मिळवून देण्यात प्रस्तावित विद्यापीठ महत्त्वाचे ठरणार आहे.