
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी काही पुरावेही दिले आहेत. इंडिया आघाडीतील पक्षांना राहुल यांनी आपल्यासोबत घेतले आहे. बिहार निवडणुकीपूर्वी हे मुद्दे उपस्थित करून त्यांनी सत्ताधारी पक्षाची अडचण केली आहे हे नक्की.
एका लोकसभा मतदारसंघात लाखांहून अधिक संशयास्पद मतदार नोंदले आणि त्यांनी मतदानही केलं, ही भाजपची सत्तेत येण्यासाठी मतचोरी असल्याचा आरोप करून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर आतापर्यंतचं सर्वांत गंभीर संकट उभे केले आहे. त्यातून पळवाटा काढण्यापेक्षा आयोगानं या आकडेवारीची चौकशी करून वास्तवाला सामोरं जाणं हाच रास्त मार्ग आहे, मात्र आयोग तांत्रिकतेचा खेळ मांडत संकट अस्तित्वातच नसल्याचा आव आणत आहे.