
वॉरेन बफे हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. ‘फोर्ब्ज’ मासिकाच्या जागतिक अब्जाधीशांच्या क्रमवारीत त्यांचे नाव कायम अग्रस्थानी असते. त्यांची कारकीर्द, तत्त्वज्ञान आणि गुंतवणूक करण्याची पद्धती ही अनेकांना प्रेरणा देणारी आहे. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या, ९४ वर्षांच्या या ऋषितुल्य व्यक्तीने आपल्या संपत्तीतील मोठी रक्कम दान केलेली असल्याने, एक परोपकारी दानशूर व्यक्ती ही त्यांची अजून एक महत्त्वाची ओळख आहे. भविष्यात त्यांनी त्यांच्या संपत्तीतील बरीचशी (जवळपास ९९ टक्के) रक्कम समाजासाठी देण्याचे ठरवले आहे. सध्या ‘बर्कशायर हॅथवे’चे ते अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘ओरॅकल ऑफ ओमाहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अनुभवी गुंतवणूकदाराने, ‘ग्रेग एबेल’ हे आपले उत्तराधिकारी असतील, असे जाहीर करून या वर्षअखेर निवृत्ती जाहीर केली आहे.
बफे यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या दूरगामी निर्णयाची माहिती फक्त त्यांना आणि त्यांचे दोन चिरंजीव यांनाच होती. तसे चार वर्षांपूर्वीच त्यांनी एबेल आपले उत्तराधिकारी असल्याचे सूतोवाच केले असले तरी निवृत्ती जाहीर केली नव्हती. ३ मे २०२५ रोजी ‘बर्कशायर हॅथवे’च्या गुंतवणूकदार परिषदेतून ती त्यांनी जाहीर केली. आता १ जानेवारी २०२६ पासून ग्रेग एबेल हे कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून बफे कायम राहतील. या निमित्ताने बफे यांच्या आजवरच्या एकंदर कारकिर्दीचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.