
नव्या आणि बदललेल्या परिस्थितीत अमेरिका पुन्हा पाकिस्तानला जवळ करत असल्याचे दिसून येते. याला आणखी एक आयाम आहे तो म्हणजे भारतावर दबाव आणायचा. ही युक्ती अमेरिकेच्या आधीच्या अनेक अध्यक्षांनी परराष्ट्र धोरणात वापरली आहे. आता पुन्हा तोच प्रयोग पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणाला बुद्धिबळाची उपमा दिली जाते. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सुरू झालेले शीतयुद्ध आणि आता पुन्हा सुरू झालेले नव्या वातावरणातले शीतयुद्ध लक्षात घेतले की, पटावरील सोंगट्या कशा सरकतील, का सरकतील, कधी सरकतील, किती घरं चालतील वगैरेंचा ढोबळ अंदाज करता येतो.
म्हणूनच सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला त्रास देणाऱ्या ‘बलूच लिबरेशन आर्मी’ या संघटनेला ‘परदेशातील दहशतवादी संघटना’ असा दर्जा दिला, तेव्हा यामागच्या डावपेचांची चर्चा सुरू झाली.