
वसंत कुलकर्णी
vasant@vasantkulkarni.com
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘निफ्टी’ने गेल्या २७ सप्टेंबरला नव्या शिखराला स्पर्श केला होता, नंतर त्यात मोठी घसरण झाली आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरचे मूल्यांकनही घटले आहे. या परिस्थितीत, आकर्षक मूल्यांकनामुळे नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी व्हॅल्यू फंडांकडे नव्याने पाहावे अशी परिस्थिती आहे. व्हॅल्यू फंड अशा शेअरमध्ये गुंतवणूक करतात, की ज्यांचा बाजारभाव मूलभूत वैशिष्ट्यांनुसार (Fundamental Characteristics) कमी असून, त्यांत भविष्यात वाढ संभवते. मूल्य गुंतवणूक (Value Investing) वृद्धी गुंतवणुकीच्या (Growth Investing) विरोधाभासी असते. वृद्धी गुंतवणूक उच्च वृद्धीची शक्यता असलेल्या उदयोन्मुख कंपन्यांवर लक्ष केंद्रित करते. व्हॅल्यू फंड अशा कंपन्यांत गुंतवणूक करतात, की ज्यांचा ताळेबंद सुदृढ असून, शेअर रास्त मूल्यांकनावर उपलब्ध असतात.