डॉ. रवींद्र उटगीकर
विकास ही मानवी व्यवहारांमागील मोठी प्रेरणा असली, तरी अलीकडच्या काळातील भौतिक विकास हा जैवविविधतेच्या संकोचाला कारणीभूत ठरू लागला आहे. निसर्गासोबतचे हे नाते असे तुटत जाणे जगाच्या अर्थकारणालाही परवडणारे नाही. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त (२२ मे) किमान ही जाणीव तरी आपणा सर्वांना व्हावी.
या पृथ्वीच्या घड्याळाचा गजर अलीकडे क्षीण होत चालला आहे. आता वेळ आहे आपणच जागे होऊन काही कृती करण्याची.
- लिओनार्डो डी- कॅप्रिओ (प्रसिद्ध अभिनेता)
‘दृष्टिआड सृष्टी’ अशी आपल्याकडे म्हण आहे. ज्या कोणा पूर्वजांनी ही म्हण प्रचलित केली असेल, त्यांनी पाहिलेली सृष्टी काही पिढ्यांनंतर खरोखरच दृष्टीआड आणि अस्तित्वापलीकडेही जाऊ लागणार आहे, याचा अंदाज मात्र त्यांना कदापि आला नसेल. ते दुर्भाग्य पुढील पिढ्यांच्या वाट्याला येत आहे.