
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चेला जोरदार सुरुवात झाली. अचानक आलेला त्यांचा राजीनामा भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडच्या नाराजीतून आला याची कल्पना सगळ्यांना आली. हा राजीनामा पुढे येणाऱ्यांना एकप्रकारे इशाराच आहे. संपूर्ण निष्ठा ठेवावीच लागेल, नसेल तर गच्छंती अटळ आहे, हाच संदेश या राजीनाम्यातून दिला गेलाय.
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा अचानक पदत्याग, त्यांनी सांगितल्याप्रमाणं आरोग्यासाठी आहे, यावर लहान मूलही विश्वास ठेवणार नाही. पद त्यांनी सोडलं की सोडावं लागलं म्हणजे भाजपच्या नेतृत्वानं त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, यावरची चर्चा स्वाभाविक आहे. धनकड यांचा राजीनामा नेमका कशासाठी, अगदी विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव आणावा इतपत सरकारचं समर्थन करणारे धनकड अचानक राजीनामापात्र कसे झाले याविषयी कारणमीमांसा होत राहील. या प्रकरणाचा स्पष्ट संदेश आहे, मर्यादा ओलांडू नका, ‘दायरे में रहो!’ या सरकारनं एखादं पद दिल्यानंतर स्वतंत्र मत किंवा वेगळी भूमिका मान्य केली जाणार नाही, संपूर्ण निष्ठा ठेवावीच लागेल, नसेल तर गच्छंती अटळ आहे.