
सुनील चावके
देशाच्या राजकारणाची सूत्रे हातात घेण्यासाठी करावा लागणारा राजकीय संघर्ष आणि दिल्लीत पाय रोवून २४ तास राजकारण करण्याची मानसिकता महाराष्ट्रातील नेत्यांनी आजवर क्वचितच दाखवली आहे. दिल्लीच्या राजकारणावर वर्चस्व गाजविण्याच्या रणनीतीने मराठी नेते मैदानात उतरल्यास महाराष्ट्राविषयीची संमिश्र धारणा सकारात्मक होईल.
राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय राजकारणापाठोपाठ सर्वाधिक चर्चा होते ती महाराष्ट्रातील घडामोडींची. अर्थात, अशा चर्चेचा रोख महाराष्ट्राच्या बलस्थानांविषयी कमी आणि राज्याच्या वादग्रस्त, नकारात्मक पैलूंविषयी जास्त असतो. चालू जुलै महिन्यात दिल्लीच्या राजकीय वर्तुळाला तसेच दिल्लीतील हिंदी-इंग्रजी माध्यमांना अशा नकारात्मक मुद्यांचे भरपूर खाद्य पुरवून महाराष्ट्र चर्चेत राहिला आहे.