Marriage problems
Esakal
पुणे - किती वर्ष झाले स्थळं बघतोय मुलासाठी पण त्याला कोणी पसंतच पडत नाहीये.. आमच्या मुलीची पण अशीच कथा आहे हो.. एकतर आधी स्थळं बघायलाच तयार नव्हती आणि आता तयार झाली आहे तर तिला कोणी आवडतच नाहीये. जवळपास १०० पेक्षा जास्त स्थळं दाखवली तिला... एका लग्नात सुरू असलेला दोन लग्नाळू मुलामुलींच्या आईवडिलांचा हा संवाद.! हल्ली असा संवाद खूपच कॉमन झाला आहे. जाऊ तिथं मुलांची वय वाढलीत, पण लग्न जमेना अशी ओरड ऐकायला मिळते. पण पुर्वी जिथं एकदोन स्थळात लग्न जमायची तिथं इतके पर्याय असूनही मुलामुलींना कोणाचीच निवड का करता येत नाही?
२०२२ या वर्षात सोलापूरात लग्नाळू मुलांना लग्नासाठी मुली मिळेनात म्हणून चक्क सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनेक सामाजिक प्रश्नांकडे या लग्नाळूंनी लक्ष वेधले होते. याला स्त्री पुरूष विषमता हे एक कारण असले तरीही याही पलिकडे अनेक मानसशास्त्रीय कारणेही असू शकतात का?
मानसशास्त्रात या अवस्थेला चॉइस पॅरालिसिस म्हणतात का? तुमच्या समोर खूप जास्त पर्याय ठेवले की तुमचा मेंदू काम करणं बंद करतो का? की अजून चांगलं मिळेल या प्रयत्नात जे समोर आहे ते नाकरतो? लग्नाच्या बाबतीतही मुलामुलींचा ‘नेटफ्लिक्स इफेक्ट’ दिसून येतोय का? हे असं होण्यामागे नेमकी कारणं काय असू शकतात आणि यावर पर्याय किंवा उपाय काय असायला हवा.. या विषयातली संशोधनं काय सांगतात हे सगळंच या सकाळ+ या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..
वयाच्या २६ शीमध्ये असणारी पूजा सांगत होती.. आज आईने मला पाच स्थळं पाठवली आहेत. पाचही मुलं ठीक आहेत. पण मला कोणीच चांगलं वाटत नाहीये. असा फोटो बघून कसा निर्णय घ्यायचा. आणि खरं सांगायचं तर या पाच पैकी एकालाही भेटायची मला इच्छाच होत नाहीये. मुळात मला हे बघाबघी प्रकरणंच पटत नाहीये.
तर २५ शीत असाणारा राहूल म्हणाला.. आम्हाला कोणी समजूनच घेत नाहीये. हल्लीच्या पोरींना फक्त चांगला पगार, घरदार हवं आहे. गावाकडं तर नाहीच म्हणतात मुली. असं वाटतंय आम्हाला कोणीच मिळणार नाही. पोरी फोटो बघूनच जेव्हा नापसंत करतात तेव्हा खूप हरल्यासाखं वाटतं.
३१ शीत असणारा प्रशांत म्हणाला, मला हल्ली ते लग्नाचं अॅपही उघडून पहावसं वाटत नाही. भरपूर स्थळं आहेत पण कोणीच मला हवं आहे तसं नाही. त्यातूनही एखादं आवडलंच तर समोरूर उत्तरच येत नाही. या सगळ्याचा खूप वैताग आलाय. यामुळे लग्न हा विषयच नको वाटतोय.
या सगळ्याच मंडळींची नावं बदलली आहेत पण यांच्या कथा मात्र खऱ्या आहेत. हल्ली लग्न हा नको इतका अवघड विषय होऊन बसला आहे. पण या मंडळींना निर्णय घेण्यात का अडचणी येत असाव्यात? अतीपर्यायांचा तर हा परिणाम नाही ना?