
मधुबन पिंगळे
अमेरिकेच्या सरकारमध्ये उद्योजक एलॉन मस्क यांची भूमिका वारंवार चर्चेत येत आहे. त्याचबरोबर अन्य देशांच्या राजकारणामध्येही मस्क ढवळाढवळ करीत आहे, अशी टीका होत आहे. यामध्ये उजव्या विचारांच्या नेत्यांना मस्क यांचा पाठिंबा आहे, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आहेत. प्रचारातील अनेक घोषणांप्रमाणेच, तडकाफडकी निर्णयांची मालिका त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे, हा दोन महिन्यांचा कार्यकाळ चर्चेत असताना, त्यांच्या सरकारमधील उद्योगपती एलॉन मस्क यांच्या भूमिकेवरूनही बराच खल होत आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मस्क यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याचा परतावा म्हणून ट्रम्प यांच्याकडून मस्क यांना सरकारचे सल्लागार अशा स्वरूपातील ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’चे (डॉज) प्रमुख असे स्थान दिले आहे. त्यातून मस्क यांची अमेरिकी राजकारणात व प्रशासनात ढवळाढवळ वाढली आहे. त्यावरून स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये नाराजी आहे.