
विजय घ्याळ
saptrang@esakal.com
अनेकांना प्रशिक्षण दिले...
उदयनगर येथे सर्वप्रथम यशवंत ट्रेडर्स या नावाने मी पहिला कृषी अवजारे तयार करणारा उद्योग सुरू केला. त्यावेळी अवजारे बनविणारे तंत्रज्ञ बाहेरच्या राज्यातून आणावी लागत असे. त्यांची मजुरी व राहण्याची व्यवस्था करावी लागायची. त्यामुळे हाती कमी पैसा उरायचा. यावर मात करून स्थानिक कारागिरांना हे काम शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. दोनशेच्यावर कारागिरांना आतापर्यंत प्रशिक्षण दिले. यापैकी काही कारागिरांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. अनेकांच्या रोजगाराची सोय झाल्याचे समाधान मिळाले आहे.
- पंढरीनाथ गुंजकर, - उद्योजक, उदयनगर
देश आज ज्या वेगाने प्रगतीची शिखरे गाठतो आहे त्याचा पाया आहे ग्रामीण भागात. कृषी उत्पादनाच्या संदर्भात जागतिक बाजारपेठेत देशाने आपले एक स्थान निर्माण केले आहे. कृषी उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कधीकाळी जनावरेही खाणार नाहीत,असा गहू अमेरिकेतून आयात करण्याची वेळ भारतावर आली होती. मात्र, आज देशातील धान्यांची कोठारे भरली असून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतीच्या समृद्धीकरणात यांत्रिकीकरणाचा वाटा मोठा आहे. शेतीसाठी लागणारी ही यंत्रे देशातच तयार होत आहेत. अकोला-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेले उदयनगर हे पाच हजार वस्तीचे गाव आता उद्योगनगरी म्हणून उदयास आले आहे.