
‘मीच अशा कितीतरी स्त्रिया पाहिल्या आहेत, की ऑफिसमध्ये काम करतात, बरा पगार मिळतो, पण तो त्या सगळा नवऱ्याला देतात! मग नवरा उदार होऊन तिला हातखर्चाला पैसे देतो. स्त्रीचा पैसा तिच्याकडे का नको, असे विचारले, की ‘बायकांना काही अक्कल नसते! त्यांच्या हातात पैसा टिकत नाही,’ हे ऐकायला मिळते. ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य मला इथे आठवते!’
आपल्या समाजात अर्थसाक्षरता कमीच आहे. भारत विकसनशील देश असल्याने एकूण राष्ट्रीय उत्पन्न जरी आकाराने मोठे दिसत असले, तरी दरडोई उत्पन्न फारच कमी आहे. म्हणजे वस्तू आणि सेवा यांचा आकडा अवाढव्य; पण देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात मुबलक पैसा नाही. त्यातही फक्त स्त्रियांचे दरडोई उत्पन्न पुरूषांपेक्षा नक्कीच कमी भरेल. स्त्रिया निगुतीने कष्ट करतात खऱ्या, पण त्या कष्टांचा मोबदला त्यांच्या खात्यात जमा होत नाही. या आर्थिक विषमतेचे ढळढळीत उदाहरण म्हणजे घराघरांत असणाऱ्या ‘हाऊसवाईफ’ बायका! त्या (तुरळक अपवाद वगळून) दिवसभर घरातली नानाविध कामे करतात.