
मधुबन पिंगळे
सरकारच्या चुकीच्या धोरणांचा मोठा फटका श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. शेतीसह सर्वच क्षेत्रांमधील विकास ठप्प झाल्यामुळे तेथील नागरिक रोजगाराच्या शोधात अन्य देशांमध्ये जात आहेत. श्रीलंकेतील या वाढत्या स्थलांतरामध्ये महिलांचे वाढते प्रमाण चिंता वाढवणारे आहे. त्याचा दीर्घ परिणाम तेथील समाजावर होण्याची भीती आहे.
निसर्गाचे वरदान असणाऱ्या चिमुकल्या श्रीलंकेसमोर बदलत्या निसर्गामुळेच आव्हान निर्माण झाले आहे. अनेक दशके चाललेल्या गृहयुद्धातून सावरत असतानाच, तेथील सरकारच्या लहरी निर्णयामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न होत असताना, हवामान बदलाचे भीषण परिणाम तेथे समोर येत आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला आहे आणि शेतीच्या उत्पादनात मोठा बदल झाल्याचे मानण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम तेथील ग्रामीण जीवनावर होत आहे. त्यामुळेच स्थलांतर ही श्रीलंकेसमोरची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यातही महिलांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असून, ही गोष्ट तेथील समाजव्यवस्थेवरही दीर्घकालीन परिणाम करणारी आहे.