esakal | वरुणराजाच्या उपस्थितीत बाप्पा विराजमान 
sakal

बोलून बातमी शोधा

वरुणराजाच्या उपस्थितीत बाप्पा विराजमान 

वरुणराजाच्या उपस्थितीत बाप्पा विराजमान 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘मोरया-मोरया’चा न थांबणारा जयघोष... जमेल त्या जागेवरून हे सगळं मोबाईलमध्ये टिपून घेण्याचा प्रयत्न करणारे गणेशभक्त... त्या सुहास्यवदना मूर्तीची एक झलक मिळावी, म्हणून त्या दिशेने डोळे लावून पाहणारा प्रत्येक जण आणि या सगळ्यांच्या सोबतीला आलेल्या सुखद वर्षाधारा... अशा दिमाखदार वातावरणात शुक्रवारी शहरात बाप्पांची मिरवणूक निघाली. घरगुती गणपतींसह मानाच्या गणपतींचीही विधिवत प्रतिष्ठापना झाली. अथर्वशीर्षासहित आरतीचे स्वर भाविकांनी आळविले. दिवसभर पुण्यनगरीत ‘बाप्पा मोरया’चाच जयघोष सुरू होता.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बरसणाऱ्या वरुणराजाच्या उपस्थितीत, ढोल ताशाच्या गजरात आणि ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात गणेशभक्तांनी श्रींचे वाजतगाजत स्वागत केले. मानाच्या पाचही बाप्पांसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्टसह हुतात्मा बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारुती मंडळ आणि शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनीही मोठ्या उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना केली. 

मिरवणुकीत सनई चौघडे वाजत होते. तर बॅन्डच्या सुरावटीतून मराठी, हिंदी चित्रपटातील विविध धार्मिक व देशभक्तिपर गीतांचे स्वर कानावर पडत होते. पुण्यनगरीचा गणेशोत्सव पाहण्यासाठी पहिल्याच दिवसापासून परदेशी नागरिक शहरात फिरून बाप्पाच्या मूर्ती आणि त्याच्या भक्तांची छबी कॅमेऱ्यात टिपत होते. 

पारंपरिक चांदीची पालखी, केळीच्या खुंटांनी सजविलेले लाकडी रथ आणि फुलांची सजावट असलेल्या रथावर विराजमान झालेल्या बाप्पाला मिरवणुकीने आणताना भक्तांचा उत्साह शिगेला पोचला होता. भर पावसात बेधुंदपणे, वादनात तरुणाई तल्लीन झाली होती. पारंपरिक वेशभूषेतील गणेशभक्त बाप्पांची मूर्ती घरी आणत होते. बाप्पाची मिरवणूक, त्याचा मार्ग, ढोलताशा पथकांचे नियोजन, मान्यवरांच्या हस्ते करावयाची प्राणप्रतिष्ठापना याच्या नियोजनात कार्यकर्ता कार्यमग्न दिसत होता. 

ब्राह्ममुहूर्तापासूनच (पहाटे साडेचार वाजल्यापासून) बहुतांश कुटुंबीयांच्या घरात कॅसेट व सीडीज्‌वर लावलेले सनईचे मंजूळ स्वर ऐकू येत होते. अनेकांनी घरच्या बाप्पाची प्रतिष्ठापना मुहूर्तावर केली. मानाच्या गणपतीला नारळाचे तोरण वाहण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

सकाळपासूनच मध्यवर्ती भागात जल्लोषी वातावरण होते. नागरिक मोबाईलमध्ये श्रींच्या मूर्ती आणि ढोलताशा पथकातील तरुण-तरुणींची छायाचित्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग, फेसबुक लाइव्हदेखील करत होते. व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरूनही शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत होता. वेगवेगळ्या प्रकारचे ताल ऐकण्याचा आनंदही भाविक  घेत होते. 

बाप्पाला पाहण्यात भाविक दंग
अश्वांच्या प्रतिमांनी आणि असंख्य फुलांनी सजलेला, असा दगडूशेठ हलवाई गणपतीचा मिरवणूक रथ आणि त्यात विराजमान झालेले बाप्पा पाहताना अनेक भाविक हरखून गेल्याचं चित्र होतं. ढोल-ताशा पथकांसह बॅंड पथकांनी केलेलं दिमाखदार वादन या वेळी उपस्थितांची दाद मिळवून गेलं. आरतीनंतर बाप्पाची मूर्ती मंदिरातून रथात आणताना ‘मोरया मोरया’चा एकच जल्लोष ऐकू येत होता.

तलवारबाजी आणि दांडपट्टा
दगडूशेठनंतर तब्बल सव्वा तासाने भाऊ रंगारी गणपतीचे बुधवार चौकात आगमन झाले. पाच ढोल-ताशा पथकांच्या दिमाखदार वादनाच्या पाठोपाठ भाऊ रंगारी गणपतीचा मिरवणूक रथ आला. या वेळी तलवारबाजी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

ढोल-ताशांमुळे उत्साह द्विगुणीत
बाबू गेनू आणि जिलब्या गणपतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाल्याचे पाहायला मिळाले. ढोल-ताशा पथकांनी वाजवलेले निरनिराळे ताल आणि त्यावर सादर केलेल्या विविध रचनांमुळे मिरवणुकीत उत्साहाचा रंग भरला होता. बाप्पांची प्रतिष्ठापना होईपर्यंत भाविक थांबून होते.

आकर्षक फुलांची महिरप
अखिल मंडई मंडळाची श्री शारदा गजाननाची देखणी मूर्ती ज्या वेळी मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाली, त्या वेळी पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी पुनरागमन केलं. बाप्पाची मूर्ती पावसात भिजू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यावर प्लॅस्टिकचे कागद धरून ठेवले होते. रथावर सजवलेली फुलांची महिरप शोभून दिसत होती.

मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना
कसबा गणपती

श्रींची मिरवणूक नारायण पेठेतील हमालवाडा येथून निघाली. चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. अधून मधून वरुणराजा हजेरी लावत होता. त्यामुळे कार्यकर्ते श्रींच्या मूर्तीवर प्लॅस्टिकचे कापड धरत होते. देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बॅन्ड, श्रीराम, आदिमाया ढोलताशा पथक, नूमविच्या मुलांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते बाप्पांची प्रतिष्ठापना झाली.

तांबडी जोगेश्‍वरी
नारायण पेठेतील मंदार लॉज येथून श्रींची मिरवणूक निघाली. गेल्या काही वर्षांपासून मंडळाच्या बाप्पांची पहिल्या दिवशीची मिरवणूक रथातून निघत असे. मात्र, यंदा मंडळाने पहिल्या दिवशीदेखील चांदीच्या पालखीतून श्रींची मिरवणूक काढली. मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा, ताल पथके होती. व्यावसायिक समीर शाह यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.

गुरुजी तालीम मंडळ
फुलांच्या रथावर विराजमान झालेल्या श्रींची मिरवणूक गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक मार्गे उत्सव मंडपात आली. जयंत नगरकर यांचे नगारावादन, गर्जन, गुरुजी प्रतिष्ठान, शिवगर्जना, महिलांचे नादब्रह्म पथकही सहभागी झाले होते. सुखेन शहा यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात  आली.

तुळशीबाग गणपती
फुलांच्या रथातून श्रींच्या हेमाडपंती मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. लोणकर बंधूंचे नगारावादन, नादब्रह्म, नूमवि, श्रीशिवदुर्ग, उगम ही पथके सहभागी झाली होती. फुले मंडई येथील नऊ ऑगस्ट क्रांतिदिन चौकातून श्रींची मिरवणूक निघाली. शनिपार चौक-लिंबराज महाराज चौक-गणपती चौक येथून मिरवणूक मंडपात आली. डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.

केसरीवाड्याचा गणपती
केसरी-मराठा ट्रस्टच्या श्रींची मिरवणूक नारायण पेठेतील माणकेश्‍वरविष्णू चौकातून निघाली. पारंपरिक पालखीत विराजमान झालेली श्रींची मूर्ती वाजत गाजत उत्सव मंडपात आणण्यात आली. बिडवे बंधूंचे सनईवादन, श्रीराम ढोलताशा पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. डॉ. दीपक टिळक आणि रोहित टिळक 
यांच्या उपस्थितीत श्रींची प्रतिष्ठापना झाली.