काल्पनिक मंदिरे आणि ऐतिहासिक हलते देखावे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 August 2017

पुणे : फुलांची आकर्षक सजावट...वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती...काल्पनिक मंदिरं यात विराजमान झालेली बाप्पाची सर्वांगसुंदर मूर्ती अन्‌ पौराणिक आणि ऐतिहासिक हलते भव्य देखावे...हे डेक्कन, एरंडवणा परिसरातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या परिसरातील अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सवात साधेपणावर भर दिल्याचे पाहायला मिळते. 

पुणे : फुलांची आकर्षक सजावट...वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती...काल्पनिक मंदिरं यात विराजमान झालेली बाप्पाची सर्वांगसुंदर मूर्ती अन्‌ पौराणिक आणि ऐतिहासिक हलते भव्य देखावे...हे डेक्कन, एरंडवणा परिसरातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या परिसरातील अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सवात साधेपणावर भर दिल्याचे पाहायला मिळते. 

एरंडवणा : 
डेक्कन, नवी पेठ, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता अशा परिसरात विस्तारलेल्या एरंडवणा परिसरात गणेशोत्सव मंडळे मध्यवर्ती शहराच्या तुलनेत कमी आहेत. मात्र, तरीही या मंडळांनी आपला वेगळेपणा जपला आहे. पौड रस्ता, कोथरूड, वारजे परिसरातून डेक्कन मार्ग मध्यवर्ती भागात प्रवेश करणाऱ्या भाविकांचा हा येण्या-जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या भागातील मंडळाचे देखावे पाहण्यासाठीही गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. कै. केशवराव सदोबा पाडळे चौकातील नवनाथ मित्र मंडळाने 'नामदेव भक्ती' हा हलता देखावा साकारला आहे. या देखाव्यात साकारलेला 25 फुटी विठ्ठल मूर्ती लक्ष वेधून घेत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी 11 मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले जाते, हे या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. स्वातंत्र्य मित्र मंडळाने 'पृथ्वी प्रदक्षिणा' हा पौराणिक देखावा साकारला आहे. या देखाव्यातील उंदीरमामाच्या पाठीवर बसून शिव-पार्वतीला प्रदक्षिणा घालणारा 'बाप्पा' सर्वांचे लक्ष वेधत आहे. नळस्टॉप येथील एरंडवणा मित्र मंडळाने 'रावण दहन' हा भव्य देखावा साकारला असून, यातील दशावतारी रावण तब्बल 25 फुटी आहे. कर्वे रस्त्यातील अमृत मित्र मंडळाने काल्पनिक मंदिर साकारलेले आहे. 

डेक्कन 
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या डेक्कन परिसरात पौराणिक देखाव्यांबरोबरच सामाजिक विषयावर भर दिला आहे. तर काही मंडळांनी साधेपणावर भर दिल्याचे पाहायला मिळते. नटराज चौकातील श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ 'शिवराज्याभिषेक सोहळा' हा जिवंत देखावा साकारला असून, हा देखावा भाविकांच्या काळजात घर करणारा आहे. नव चैतन्य मंडळानेही आकर्षक सजावट केली आहे. खंडुजीबाबा चौकातील श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टने यंदा काल्पनिक मंदिर साकारले असून, त्यातील विद्युत रोषणाईने देखावा उजळून दिसत आहे. गोखले स्मारक चौक मित्र मंडळ ट्रस्टने 'सॅण्ड आर्ट'च्या साहाय्याने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा विषय 'स्लाइड शो'द्वारे हळुवारपणे उलगडला आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करत तिचे महत्त्व समजावून सांगणारा हा देखावा भाविकांच्या मनाचा वेध घेत असल्याचे दिसून येते. फर्ग्युसन रस्त्यातील सुदर्शन मित्र मंडळाने 'श्रीकृष्ण' भक्ती साकारणारा देखावा आकर्षित करत आहे. डेक्कन परिसराला जोडून असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भारत मातेला वंदन करत शहिदांना श्रद्धांजली अर्पण करणारा देखावा साकारला आहे; तर ज्ञानेश्‍वर मित्रमंडळाने गाण्याच्या तालावर थिरकणारी विद्युत रोषणाईचा देखावा केला आहे. 

आवर्जून पाहावे असे :- 

  • श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ : 'शिवराज्याभिषेक' जिवंत देखावा 
  • गोखले स्मारक चौक मित्र मंडळ ट्रस्ट : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' सॅण्ड आर्ट 
  • नवनाथ मित्र मंडळ : 'नामदेव भक्ती' देखावा 
  • एरंडवणा मित्र मंडळ : 'रावण दहन', 25 फुटी रावण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Pune Ganesh Utsav