भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी रस्ता, बेलबाग चौक - शहराच्या मध्यभागातील गणेश मंडळांची नयनरम्य रोषणाई, देखावे पाहण्यासाठी रविवारी नागरिकांची झालेली गर्दी.

भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले

पुणे - गणेश विसर्जनास दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे आणि त्यात रविवार असल्याने संपूर्ण शहरच जणू रस्त्यांवर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः मध्यवर्ती भागांतील रस्ते भाविकांच्या गर्दीने शब्दशः दिसेनासे झाले होते.

मंडळांचे देखावे पाहायला अनेकजण सहकुटुंब बाहेर पडले होते. "पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा', "अष्टविनायका तुझा महिमा अपार' यासह विविध गाण्यांनी सर्वत्र वातावरणही गणेशमय झाले होते. अनेक ऐतिहासिक, पौराणिक आणि काल्पनिक विषयांवरील हलते व जिवंत देखावे पाहण्याला भाविकांनी विशेष पसंती दिल्याचे दिसत होते. अनेक ठिकाणी तर रात्री उशिरापर्यंत लोक थांबून होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळांच्या सजावटी पाहण्यास तर गर्दीचा महापूरच लोटला होता. आपल्या बालगोपाळांना खांद्यावर घेऊन जाणारे "बाबा', खेळण्यांसह विविध वस्तूंची दुकाने, विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्सचीही रेलचेल जागोजागी पाहायला मिळत होती. मित्र-मैत्रिणींचे अनेक ग्रुप एकत्र येऊन हा आनंदी अनुभव घेताना दिसून आले. वाढती गर्दी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांसह वाहतूक पोलिस ठिकठिकाणी तैनात होते. अनेक ठिकाणी वाहनांना बंदी घालण्यात आली होती.

सकाळपासून शहरातील रस्त्यांवर असणारी सर्वसाधारण गर्दी दुपारनंतर हळूहळू वाढत गेली. सायंकाळी यात भर पडली आणि रात्रीपर्यंत "मुंगी चालायलाही जागा नसावी' असे गर्दीचे महारूप मध्यवर्ती भागांतील रस्त्यांवर पाहायला मिळाले. अप्पा बळवंत चौक, गणपती चौक, मंडई, केंजळे चौक या भागासह मध्यभागातील अनेक रस्ते पायी चालणाऱ्या भाविकांसाठी एकेरी करण्यात आले होते.