गणरायाचे दागिने लाखमोलाचे!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 August 2017

पुणे - शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त बहुतांश मंडळांनी लाडक्‍या बाप्पाला नाना तऱ्हेचे सोन्या- चांदीचे, रत्नजडित दागिने केले आहेत. घरच्या बाप्पासाठी देखील चांदीचा मूषक, मोदक, मुगुट, जास्वंदाचे फूल, कमळ, केवडा खरेदी करण्यासाठी देखील अनेकांची पावले सराफी पेढ्यांकडे वळत आहेत. विशेष म्हणजे बाप्पाला आभूषणांनी मढविण्याची क्रेझ मंडळांमध्ये निर्माण झाली असून, मंडळा-मंडळांमार्फतही एकमेकांना चांदीच्या वस्तू भेट देण्यात येऊ लागल्या आहेत.    

पुणे - शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त बहुतांश मंडळांनी लाडक्‍या बाप्पाला नाना तऱ्हेचे सोन्या- चांदीचे, रत्नजडित दागिने केले आहेत. घरच्या बाप्पासाठी देखील चांदीचा मूषक, मोदक, मुगुट, जास्वंदाचे फूल, कमळ, केवडा खरेदी करण्यासाठी देखील अनेकांची पावले सराफी पेढ्यांकडे वळत आहेत. विशेष म्हणजे बाप्पाला आभूषणांनी मढविण्याची क्रेझ मंडळांमध्ये निर्माण झाली असून, मंडळा-मंडळांमार्फतही एकमेकांना चांदीच्या वस्तू भेट देण्यात येऊ लागल्या आहेत.    

गणेशोत्सवात अनेक स्थित्यंतरे झाली आणि दरवर्षी नवनवे बदल अनुभवायला मिळतात. गेल्या काही वर्षांपासून लाखो रुपयांचे दागदागिनेही बाप्पाला करण्यात येत आहेत. हे दागिने घडविण्यासाठी बंगाली, कर्नाटकी कारागिरांना देखील या निमित्ताने पुण्यात बोलावणे आले. काही मंडळांकडे शंभराहून अधिक वर्षांच्या श्रींच्या मूर्ती आहेत. हुबेहूब त्या मूर्तीसारखीच चांदीची, पंचधातूची मूर्ती काही मंडळांनी बनवून घेतली आहे. पुष्कळशा मंडळांनी बाप्पासाठी चांदीची पालखी देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. काही मंडळांनी चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचे पाणी चढवून घेतले आहे. काही मंडळे तर दरवर्षीच बाप्पाला एक-एक चांदीचा दागिना कारागिरांकडून करवून घेऊ लागली आहेत. 

श्रींसाठी मुगुट, प्रभावळ, पाश-अंकुश, शुंडाभूषण, दात, कान, हार, हात, उपरणे, सोवळे, अंगठी, मूषक, मोदक, चांदीचे ताम्हण, पळी-पंचपात्र, घंगाळे, पाट, चौरंग, देव्हारा, घंटा, श्रींची पूजेची मूर्ती, छत्री, विड्याचे पान, दूर्वा, केवडा, कमळ, जास्वंदीचे फूल, जानवे, कर्णफुले असे असंख्य लहान- मोठ्या आकारातले दागिने घडवून घेण्यात येत आहेत. श्रद्धेने देखील बहुतांश नागरिक वेगवेगळ्या मंडळांच्या श्रींच्या मूर्तीस सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करू लागले आहेत. त्यामुळे मंडळांकडेही सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे बाप्पाच्या अंगावर चाळीस- पंचेचाळीस किलोचे दागिनेही चढविण्यात येऊ लागलेत. घरच्या बाप्पासाठी पूजेच्या साहित्यातील चांदीच्या वस्तूंच्या सेट्‌सनाही नागरिकांकडून मागणी आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्या ऐपतीप्रमाणे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असून, विशेषतः चांदीच्या दागिन्यांना सर्वाधिक पसंती आहे. 

मंडळांची दागिन्यांमध्ये गुंतवणूक

रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात वर्षभर श्रींच्या चांदीच्या मूर्तीसाठी सत्तर टक्के मागणी असते. घरच्या बाप्पासाठी भाविक एक हजार, पाच हजार किंवा त्याहूनही अधिक किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करतात. देखाव्यांवर खर्च करण्यापेक्षासुद्धा काही मंडळे दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू लागली आहेत. त्यामुळे मंडळांकडून ३५ ते ४० किलोचे दागिने घडवून घेतले आहेत. लाकडावर चांदीचा पत्रा चढवून केलेले दागिने भरीव दागिन्यांपेक्षा तुलनेने कमी किमतीचे आहेत. मात्र, ज्या मंडळांची आर्थिक स्थिती चांगली आहे, ते भरीव घडणावळीतले दागिनेसुद्धा करवून घेतात. गुजराती, प. बंगाल आणि दाक्षिणात्य कारागिरांकडून घडणावळीतले दागिने घडवून घेण्यात येतात.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news ganesh festival 2017 ganpati jewellery