"मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 September 2017

पुणे - "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकरच या'..."गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला', या घोषात शालेय विद्यार्थ्यांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी (ता.31) निघाली. पालखीत विराजमान झालेल्या बाप्पाला विद्यार्थ्यांनी भावपूर्ण निरोप दिला. तर बहुतांश घरगुती गणपतींचे तसेच ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे विसर्जन करण्यात आले. नदीऐवजी हौदातील पाण्यात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दर्शविली.

कुलाचाराच्या परंपरेनुसार काहीं कुटुंबीयांच्या घरच्या बाप्पाचे गौरीसमवेतच विसर्जन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रालगतच्या घाटांवर महापालिकेतर्फे दक्षतेसंदर्भातील उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. आपटे घाट, पटवर्धन घाट, वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर घाट, बापूचा घाट, अष्टभूजा घाट, नटेश्‍वर घाट, पांचाळेश्‍वर घाट येथे विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी हौदातील पाण्यातच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले.

सकाळपासूनच श्रींच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी भाविक हौदावर जमत होते. सायंकाळनंतर मात्र विसर्जनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. श्रींची आरती करून, खिरापत वाटत अनेकांनी बाप्पाच्या मूर्ती हौदातील पाण्यात विसर्जित केल्या.

विशेषत्वाने सोसायट्यांचा गणपती तसेच उपनगरांतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुका काढण्यात येत होत्या. भावे हायस्कूलच्या श्रींची विसर्जन मिरवणूक पालखीतून काढण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नंदा प्रताप म्हणाल्या, 'घाटांवर विसर्जनाची तयारी महापालिकेने केली आहे. जीवरक्षक नेमले असून, हौदही बांधण्यात आले आहेत. पुष्कळसे नागरिक नदीपेक्षा हौदातील पाण्यात श्रींच्या मूर्ती विसर्जन करू लागले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हौदातील पाण्यातच विसर्जन करणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.''

बाबा भिडे पूल येथील हौदातील पाण्यात आत्तापर्यंत सात दिवसांत सहाशेहून अधिक मूर्ती विसर्जित झाल्या. गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत चाळीस मूर्ती विसर्जित झाल्या होत्या, तर नदीमध्ये केवळ दहा मूर्तींचे विसर्जन झाल्याचे महापालिका कर्मचारी ईश्‍वर शेंडगे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news ganesh festival 2017 ganpati visarjan