सोसायटींचे गणराय आणि सेलिब्रिटींसोबत सेल्फी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 August 2017

‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग 

पुणे - कोणी जवानांना सलाम करणारा देखावा साकारला, तर कोणी पंचतत्त्वाचे महत्त्व उलगडणारा देखावा... सिंहगड रस्ता आणि कोथरूड येथील सोसायट्यांमधील प्रत्येक रहिवाशाने एकत्र येऊन साकारलेले विविध देखावे शनिवारी लक्षवेधी ठरले. त्याला अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनीही कौतुकाची थाप दिली. ‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेच्या निमित्ताने मृण्मयी यांनी शनिवारी चार सोसायट्यांना भेट दिली अन्‌ रहिवाशांचे कौतूक केले. मृण्मयी यांनी आरती केल्यानंतर रहिवाशांशी संवाद साधला अन्‌ सेल्फीही काढल्या.  

‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग 

पुणे - कोणी जवानांना सलाम करणारा देखावा साकारला, तर कोणी पंचतत्त्वाचे महत्त्व उलगडणारा देखावा... सिंहगड रस्ता आणि कोथरूड येथील सोसायट्यांमधील प्रत्येक रहिवाशाने एकत्र येऊन साकारलेले विविध देखावे शनिवारी लक्षवेधी ठरले. त्याला अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनीही कौतुकाची थाप दिली. ‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेच्या निमित्ताने मृण्मयी यांनी शनिवारी चार सोसायट्यांना भेट दिली अन्‌ रहिवाशांचे कौतूक केले. मृण्मयी यांनी आरती केल्यानंतर रहिवाशांशी संवाद साधला अन्‌ सेल्फीही काढल्या.  

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘सकाळ’ने सोसायटी गणपती स्पर्धा आयोजिली आहे. त्याअंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी सोसायट्यांमधील देखाव्यांची पाहणी केली. त्यांनी सोसायट्यांच्या सामाजिक उपक्रमांविषयी माहितीही घेतली. संतोष साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. ‘एसबीआय’ लाइफ इन्शुरन्स कंपनी या उपक्रमाचे प्रायोजक असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे सहप्रायोजक आहेत. ही स्पर्धा सोमवारपर्यंत (ता. २८) सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत रंगेल.

सनसिटी सोसायटी (सिंहगड रस्ता)
यंदा सोसायटीने भारतीय सैन्यदलाला सलाम करणारा देखावा साकारला आहे. टाकाऊ वस्तूंपासून हा सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला आहे. मृण्मयी देशपांडे यांनी सोसायटीला भेट दिली अन्‌ येथील रहिवाशांची गप्पा मारल्या. ‘एसबीआय’ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक विजय वाघ, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या धायरी शाखेचे व्यवस्थापक किरण येनपुरे, सोसायटीचे समीर रुपदे उपस्थित होते.

सन एम्पायर सोसायटी (सिंहगड रस्ता)
सोसायटीने या वर्षी मंदिराची प्रतिकृती साकारली असून, हा देखावाही पाहण्यासारखा आहे. मृण्मयी यांनाही हा देखावा आवडला. देखाव्याचे कौतुक करत त्यांनी एकत्र येऊन असाच गणेशोत्सव साजरा करा, अशी भावना व्यक्त केली. अशा सण-उत्सवांमुळेच लोकांमध्ये एकोपा वाढतो, असेही त्या म्हणाल्या. सोसायटीचे सुहास लवळीकर उपस्थित होते.

वेदविहार सोसायटी (कोथरूड)
शनिवारवाड्याची प्रतिकृती आणि त्याला आकर्षक विद्युत रोषणाई असा देखावा सोसायटीने तयार केला आहे. विशेष म्हणजे सोसायटीने शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे मृण्मयी यांना हा ऐतिहासिक देखावा खूप भावला. सोसायटीतील तरुण-तरुणींबरोबर त्यांनी सेल्फीही क्‍लिक केले. सोसायटीचे नील विध्वंस, अंजली आपटे उपस्थित होते. 

स्वस्तिश्री सोसायटी (कर्वेनगर)
सोसायटीने पंचत्त्वांवर आधारित हा देखावा सोसायटीच्या रहिवाशांनी तयार केला आहे. या देखाव्याचेही मृण्मयी यांनी कौतुक केले आणि रहिवाशांशी संवाद साधत त्यांनी वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. ‘एसबीआय’ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मिलिंद जावळे, सुभाष क्षीरसागर, राजेंद्र सावंत, विजय नरुला, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे रमेश देशपांडे आणि सोसायटीच्या नेहा जोशी उपस्थित होते. 

सोसायट्यांनी जपलेला हा सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वपूर्ण आहे. अशा सण-उत्सवांमुळे लोकांमधील एकोपा वाढतो आणि विचारांची देवाण-घेवाण होते. सण-उत्सवांत त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. तो यानिमित्ताने दिसतोय. यामुळे गणेशोत्सवातील आनंद आणि चैतन्य आणखी द्विगुणित होईल.   
- मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news ganesh festival 2017 pune ganesh utsav