गणरायाच्या चरणी भजनातून वारकऱ्यांची सेवा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 August 2017

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात भारतीय वारकरी मंडळ, वारकरी सेवा मंडळाचा सहभाग

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात भारतीय वारकरी मंडळ, वारकरी सेवा मंडळाचा सहभाग
पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी गणेशोत्सवात शनिवारी रात्री वारकरी संप्रदायिक चालीतील भजनाने उपस्थितांची मने जिंकली. या आगळ्या-वेगळ्या भजनाला संप्रदायातील प्रमुख संस्थानच्या मानकऱ्यांसह कीर्तनकार आणि पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी भजनाच्या रूपाने आपली सेवा गणरायाच्या चरणी रुजू केली.

पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई यावर भर असतो. अनेक मंडळे सामाजिक उपक्रमांमधून लाखो गणेश भक्तांमध्ये प्रबोधन करतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे यंदा शतकोत्तर रोप्य महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त मंडळाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून येथील मंडळात वारकरी संप्रदायिक भजनाची परंपरा सुरू केली आहे. भारतीय वारकरी मंडळ (पुणे शहर) आणि वारकरी सेवा मंडळ तसेच जिल्ह्यातील दिंड्या तसेच संस्थांच्या वतीने पारंपरिक भजन होते. शनिवारीही संततधार सुरू असतानाही पुणे शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी भजनात सहभाग घेतला. त्यात अनेक कीर्तनकार तसेच नामवंत गायकांचा समावेश होता. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते वीणा पूजनाने या भजनास प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासणे, शिवाजीराव मोरे, अभिजित मोरे, मारूती कोकाटे, संदीप पळसे, धनंजय बडदे आदी उपस्थित होते. या भजनात क्रमाने अभंग गाण्याची संधी देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news warkari service by bhajan for ganpati