बारामतीतून निघणार मराठा संवाद यात्रा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 August 2018

बारामती शहर - मराठा क्रांती मोर्चादरम्यान काही बाहेरच्या समाजकंटकांनी हिंसक वळण लावले, मात्र समाजामध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने बारामतीतून मराठा संवाद यात्रा आयोजित केली जाणार आहे. 

बारामती शहर - मराठा क्रांती मोर्चादरम्यान काही बाहेरच्या समाजकंटकांनी हिंसक वळण लावले, मात्र समाजामध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने बारामतीतून मराठा संवाद यात्रा आयोजित केली जाणार आहे. 

याबाबत या यात्रेचे प्रमुख प्रशांत नाना सातव यांनी आज माहिती दिली, की मध्यंतरीच्या काळात मराठा मोर्चादरम्यान काही हिंसक घटना घडल्या, मात्र मराठा समाजाने आजवर काढलेले सर्वच मोर्चे शांततेच्या मार्गानेच काढलेले होते. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्तींनी केला. या पुढील काळात समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी व सलोखा कायम राहावा, यासाठी सर्वच घटकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने संवाद रथाच्या माध्यमातून ५ ते ९ ऑगस्टदरम्यान बारामती ते मुंबई अशी मराठा संवाद यात्रा आयोजित केली आहे. 

बारामतीतील शिवाजी उद्यान येथून या यात्रेस प्रारंभ होणार असून, ६ रोजी सासवड, ७ ऑगस्टला पिंपरी- चिंचवड, ८ रोजी नवी मुंबईला मुक्काम करून संवाद यात्रेचा समारोप ९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर केला जाणार आहे. 

माहिती पत्रकांचे वाटप, आरक्षण मोहिमेत शहीद झालेल्यांना श्रद्धांजली, जागृती व प्रबोधन असे उपक्रम या संवाद यात्रेतून केले जाणार आहे. ही यात्रा पक्षविरहित असून, समाजाच्या सर्व घटकातील लोक यात सहभागी होऊ शकतात, असे प्रशांत सातव यांनी सांगितले. 

सेव्ह मराठा सेफ मराठा...
गेल्या काही दिवसांतील पार्श्वभूमी विचारात घेता ‘सेव्ह मराठा सेफ मराठा’ ही टॅगलाइन घेऊन ही संवाद यात्रा राज्याच्या विविध भागांतून मुंबईपर्यंत मार्गक्रमण करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journey to Maratha from Baramati