
तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालये, दुकाने शंभर टक्के बंद राहिल्याने सर्वत्र कडकडीत बंदचे वातावरण दिसत होते.
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालये, दुकाने शंभर टक्के बंद राहिल्याने सर्वत्र कडकडीत बंदचे वातावरण दिसत होते. अत्यावश्यक सेवा फक्त सुरू होत्या. सरकारी कर्मचाऱ्यांचे संपामुळे कार्यालये ओस पडली होती त्यात बंद असल्याने कोणी या कार्यालयात फिरकले नाही. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येण्याचे टाळले. रस्ते वाहनांच्या अभावी मोकळे दिसत होते.
सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी 9 वाजल्यापासून शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जमू लागले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यानंतर बस स्थानकाजवळ ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे देखील येथे आणून बांधली. परिसरातील विविध गावच्या भजनी मंडळींनी भजने सादर केली. या आंदोलनास विविध संस्था, संघटनांनी पाठींबा दिला. आंदोलकांना चहा, पाणी, नाश्ता आदी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यावेळी पेपर डिश, कप आदीचा झालेला कचरा गोळा करण्यात आला. आंदोलना दरम्यान रुग्णवाहिका आल्यास रस्ता मोकळा करून दिला जात होता. पोलिस निरीक्षक सुरेश बोडखे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.