Maratha Kranti Morcha : तळेगाव दाभाडेत मराठा क्रांती मोर्चाचा कडकडीत बंद

गणेश बोरुडे
Thursday, 9 August 2018

तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी 9:30 वाजल्यापासून तळेगाव-चाकण महामार्गावरील मराठा क्रांती चौकात जमा होऊन ठिय्या मांडून बसले.

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी 9:30 वाजल्यापासून तळेगाव-चाकण महामार्गावरील मराठा क्रांती चौकात जमा होऊन ठिय्या मांडून बसले. भगवे झेंडे हातात घेत मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे आणि जय भवानी जय शिवराय अशा घोषणा देत रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा आमदार कार्यालयासमोर वळवत जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होत मराठा आरक्षणाला आपला पाठींबा जाहीर केला. विशेष म्हणजे आमदार बाळा भेगडे हे देखील संपूर्ण ठिय्या आंदोलनात सामील होऊन घोषणा देत होते.

दरम्यान झालेल्या भाषणामध्ये आजचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दबाव आणल्याचा आरोप काहींनी केला तर, तीन वर्षे नुसता अभ्यास करणारे सरकार मराठा आंदोलनाबाबत नापास झाल्याची खिल्ली देखील उडवण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिन, मराठा आंदोलन, पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधातील आंदोलनातील हुतात्म्यांसह शहीद कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आंदोलनातील महत्वाचे मुद्दे -
● तळेगाव-चाकण महामार्गावर ठिय्या आंदोलन झालेल्या चौकाला मराठा क्रांती चौक असे नामकरण
● स्टेशनच्या हनुमान दहीहंडी उत्सव समितीची यंदाची हंडी रद्द करून मराठा हुतात्म्यांच्या कुटुंबियांना मदत करणार
● भर पावसातही कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या
● खुद्द स्वतःच्याच कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनात सहभागी होत आमदार बाळा भेगडे यांचा मराठा आंदोलनाला पाठींबा
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh Maratha Kranti Morcha at talegaon dabhade