#MarathaKrantiMorcha हिंजवडीत ‘बंद’ शांततेत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 July 2018

हिंजवडी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हजारो मुळशीकर तरुण रस्त्यावर उतरले व त्यांनी हिंजवडीत रस्त्यावर ठिय्या मांडून सरकारचा निषेध केला. आंदोलनात प्रथमच सर्वपक्षीय कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी एकत्र आले होते. विधान भवनात काम करणाऱ्या २८८ आमदारांपैकी मराठा समाजाच्या १४५ आमदारांनी जनतेच्या भावना लक्षात घेत विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यास मराठा आरक्षणाला कोणीच रोखू शकत नाही, अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. 

सकाळी अकरा वाजता मेझा नाईन चौकातून मराठा मोर्चाला सुरवात झाली. आयटीतील वाहतुकीला कुठलाही अडथळा न ठरता शांततामय मार्गाने निघालेल्या मोर्चाचा समारोप हिंजवडीच्या शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन व सरकारविरोधी निदर्शने करून झाला. 

सरकारविरोधी घोषणाबाजी
हातात आरक्षणविषयक व सरकारविरोधी फलक, भगवे झेंडे घेतलेल्या आंदोलनकर्त्यांनी शिवाजी चौकात सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या वेळी जमलेल्या सकल मराठा समाजाच्या तरुणांनी व लोकप्रतिनिधींनी तीव्र शब्दांत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात तरुणांसह हिंजवडीतील महिला व तरुणींचा सहभाग होता. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंजवडी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. 

आयटी वाहतुकीवर परिणाम नाही 
हिंजवडी आयटी उद्यानात दीडशेच्या आसपास आयटी कंपन्या कार्यरत असल्याने येथे सुमारे चार ते पाच लाख कामगार नित्याने येतात. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन वाहतुकीचे नियोजन केले होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त लावून वाहतूक अन्य मार्गांनी वळविल्याने आयटीतील वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha kranti morch in hinjewadi