Maratha Kranti Morcha: यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही

Maratha-Kranti-Morcha
Maratha-Kranti-Morcha

पुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर तोडफोड झाली. अशा प्रकारातून आंदोलनाची व समाजाची बदनामी होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे आणि सचिन आडेकर यांनी जाहीर केले. पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास त्या दिवशी आत्मक्‍लेश आंदोलन करण्यात येणार आहे. त्या दिवशी मराठा समाज घरोघरी चूल बंद आंदोलन करणार आहे. तसेच यापुढे रास्ता रोको, रेल रोको यांसारखी समाजाला वेठीला धरणारी व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनाऐवजी जिल्हा-तालुका स्तरावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा त्यांनी केली. राज्य समन्वय समितीच्या बैठकीत हीच भूमिका मांडण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल झालेले ठिय्या आंदोलन राज्य समन्वय समितीच्या ठरवून दिलेल्या नियोजनाप्रमाणे शांततेत पार पडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वांना घरी परतण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, आंदोलनात घुसलेल्या बाह्य शक्तींनी या वेळी धुडगूस घातला. त्या प्रकाराशी मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही सबंध नाही. हिंसक कारवाया करणाऱ्यांचे आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केली आहे. 

कुंजीर म्हणाले, ‘‘या पुढची आंदोलने आचारसंहितेचा फलक लावून केली जातील. आंदोलनात बाहेरच्या शक्ती घुसल्यास आमचे स्वयंसेवक त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देतील. आचारसंहितेनुसार चक्री उपोषणासह यापुढील सर्व आंदोलने शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने होतील. अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा नेत्यांनी स्वतंत्रपणे आंदोलन करू नये. केल्यास त्यांचा आणि मराठा क्रांती मूक मोर्चाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही.’’

पोलिसांवरील हल्ल्याबाबत दिलगिरी 
आंदोलनात पत्रकार व पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबद्दल कुंजीर यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांनी आंदोलकांना चांगली वागणूक दिली. त्यांनी परिस्थिती खूप संयमाने हाताळली. पण काहींनी मराठा समाजाला गालबोट लावण्याच्या हेतूनेच आंदोलनात माणसे पाठवली होती. त्यांची नावे पोलिस तपासात पुढे येतीलच, असे पासलकर यांनी सांगितले. शहरात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. त्याच्याशी आमचा संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले.

नुकसान भरून देणार
ठिय्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले. ही घटना सकल मराठा समाजाला मान्य नाही. त्यामुळेच राज्यभरात योग्य संदेश देण्याच्या उद्देशातून या नुकसानीची भरपाई करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तोडफोड, हिंसा आम्हाला मान्य नाही. आरक्षण व सरकार दरबारीच्या इतर मागण्यांसाठी सनदशीर मार्गानेच आंदोलन झाले पाहिजे, असेही समन्वयकांच्या वतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com