पुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह पिंपरी-चिंचवडसाठी गुरुवारी (ता. ९) सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे.

शहरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि खडकमाळ येथील मामलेदार कचेरी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौकात आंदोलन होणार असल्याने तेथेही बंदोबस्त असणार आहे. शहर व पिंपरीसाठी चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, १० पोलिस उपायुक्त, १५ सहायक आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सहा हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. दंगली नियंत्रण पथकासह वज्र, वरुण ही दंगलरोधक वाहनेही तयार आहेत. पोलिस नियंत्रण कक्षाकडे इतर कर्मचारी व अधिकारी राखीव असल्याचे व्यंकटेशम यांनी सांगितले.
नागरिकांनी शांततेत आंदोलन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून कोणत्याही माहितीबद्दल खातरजमा करून घ्यावी.
- के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे
राष्ट्रीय महामार्गांवरही बंदोबस्त
काही दिवसांपूर्वी चाकण येथे झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पुणे जिल्ह्यातून जाणारे नाशिक, सातारा, नगर, सोलापूर यांसह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवर अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घेतली गेली आहे. जिल्ह्यात दोन हजार २०० पोलिस कर्मचारी, ९०० होमगार्ड, तीन सीआरपीएफच्या कंपनी, एक दंगल नियंत्रण पथक, २० स्ट्रायकिंग कंपनी असा बंदोबस्त ठेवला आहे. चाकणमध्ये शांततेसाठी बैठक घेतल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.