
भोर - ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत असूनही राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे,’’ असा आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी केला.
भोर - ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत असूनही राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे,’’ असा आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी केला.
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी भोर शहरात मोर्चा काढून राजवाडा चौकात तहसील कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. भोरमध्ये दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा समाजातील हजारो तरुण-तरुणींनी गुरुवारी सकाळी शहरातून मोर्चा काढून राजवाडा चौकात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळी दहा वाजता चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. सम्राट चौकातील वीरांच्या स्मृतिस्तंभास अभिवादन केल्यानंतर मोर्चा राजवाडा चौकात नेण्यात आला.
आंदोलनात आमदार थोपटे यांच्यासह नगराध्यक्षा निर्मला आवारे, लहू शेलार, दिलीप बाठे, यशवंत डाळ, सुधीर कोठावळे, चंद्रकांत बाठे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, सोमनाथ ढवळे, सचिन देशमुख, वंदना धुमाळ, सीमा तनपुरे, सुनीता बदक, सिद्धार्थ टापरे, गणेश पवार आदींसह मराठा तरुण-तरुणींबरोबर महिला व ज्येष्ठ नागरिक, तसेच तालुका, शहरातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार यांनी शहरातील चौकाचौकांत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमदार थोपटे म्हणाले, ‘‘इतर समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य आहे. परंतु सरकारला मराठा आरक्षण देण्याची इच्छा नाही. आपण कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेच्या मार्गाने आंदोलने करून आरक्षण देण्यास भाग पाडू. यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व सकल मराठा समाजाने एकत्रितपणे उभा राहिला आहे.’’
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही; तोपर्यंत शांततेच्या मार्गाने हा लढा सुरू ठेवण्याचा निश्चय या वेळी करण्यात आला. दुपारी दोन वाजता आंदोलनाचा शेवट झाला.