#MarathaKrantiMorcha चाकण एमआयडीसी उद्या बंद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 August 2018

आंबेठाण - मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. ९)  पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी सुटीच्या वेळापत्रकात बदल करावा, असे करणे ज्यांना शक्‍य नाही, त्यांना पुरेसे संरक्षण दिले जाईल, असा विश्‍वास पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारखानदारांना दिला आहे. मात्र, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या सर्व सभासदांनी बैठकीनंतर कंपन्या बंद ठेवण्याच्या निर्णयाला प्रतिसाद दिला.

चाकण येथे मराठा आंदोलनानंतर झालेल्या हिंसक घटनेमुळे चाकण ‘एमआयडीसी’मधील भयभीत झालेल्या कारखानदारांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करण्यासाठी आणि गुरुवारी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी ब्रिजस्टोन कंपनीत बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोनपे, राम पठारे, ब्रिजस्टोन इंडियाचे संचालक अजय सेवेकरी, पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, सचिव दिलीप बटवाल यांच्यासह चाकण एमआयडीसीमधील बहुतांश कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत पिंपरी-चिंचवड, पुणे अशा शहरी भागातून येणाऱ्या कामगारांसाठी संरक्षण मिळणार का, आंदोलनाचे स्वरूप काय असेल,  चाकण घटनेनंतर बाहेरून येणाऱ्या दंगेखोरांना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, इंटरनेट सेवेबाबत काय निर्णय घेणार, असे अनेक प्रश्‍न कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केले. मोठ्या कारखानदारांनी कंपनी बंद ठेवली, तर लहान पुरवठादारांना आणि कंपन्यांना बंद ठेवणे शक्‍य होईल, असे निदर्शनास आणून दिले.

या वेळी सचिव दिलीप बटवाल यांनी गुरुवारी सर्व कारखानदारांनी सुटी घ्यावी, असे आवाहन केले. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला. या बैठकीवेळी निवृत्त उपविभागीय अधिकारी राम पठारे यांचा सन्मान करण्यात आला. 

आंदोलनाच्या दिवशी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दिला जाईल. चाकण येथे घडलेल्या घटनेनंतर ‘रास्ता रोको’ होऊ नये म्हणून बैठका घेतल्या असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कामगारांनी भीतीमुक्त वातावरणात कामावर यावे, यासाठी पुरेसा बंदोबस्त दिला जाईल. ‘व्हॉट्‌सॲप ग्रुप’च्या माध्यमातून सर्व प्रतिनिधींना वेळोवेळी मेसेज दिले जातील.
- तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha Chakan MIDC Close by Maratha Reservation Maharashtra Close